दुष्काळी अनुदानासाठी 119 कोटींचा प्राप्त 

दुष्काळी अनुदानासाठी 119 कोटींचा प्राप्त 

जळगाव ः यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रब्बीची पिकेही धोक्‍यात आहेत. यामुळे जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ शासनाने जाहीर केला. राज्यातील दुष्काळावर शेतकऱ्यांना मदत म्हणून साडेसात हजार कोटींची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्याला सहाशे कोटींपेक्षा अधिक मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यातील 119 कोटी 89 लाखांची मदत प्राप्त झाली आहे. ही मदत दुष्काळग्रस्त तेरा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. 

जिल्ह्यात पावसाळ्यात पाऊस पडण्याचे प्रमाणे 663.30 मिलिमीटर आहे. यंदा 446.80 मिलिमीटर अर्थात 67.4 टक्के पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट आली. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. रब्बी पिकांच्या उत्पादनातही घट होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील दुष्काळाबाबत केंद्र शासनाच्या चार सदस्यीय समितीने पाच डिसेंबर 2018 ला पिंपळगाव गोलाईत (ता. जामनेर), दगडी, जुनोने (ता. अमळनेर) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात कापूस, तूर, उडीद, मुगासह इतर पिकांच्या भयावह परिस्थितीची पाहणी केली. अनेक ठिकाणी पाणी टंचाईची पाहणी केली होती. 

पाहणी समितीच्या दौऱ्यानंतर जिल्ह्याला सुमारे सहाशे कोटींची मदत अपेक्षित असल्याचा अहवाल राज्य व केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यात सुधारणा करून जिल्ह्यासाठी 567 कोटी 43 लाखांची मदत, अधिक बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 कोटींची अशी 585 कोटी 43 लाखांची मदत जिल्ह्याला मिळणे अपेक्षित आहे. त्यापैकी शेतकऱ्यांना मदतीसाठी 239 कोटी 79 लाखांचा निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार प्रथम हप्ता (वितरण मान्यतेच्या 50 टक्के) 119 कोटी 89 लाखांची मदत जिल्हा प्रशासनास मिळाली आहे. तालुकानिहाय शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीसाठी तालुकास्तरावरून मदतीची मागणी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यानुसार नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तहसीलदारांतर्फे मदत जमा केली जाईल. 
 
जिल्ह्यास दुष्काळासाठी मदत म्हणून 119 कोटी प्राप्त झाले आहे. तालुकानिहाय शेतकऱ्यांना किती मदत द्यावयाची, याबाबतच्या विवरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे फाइल ठेवण्यात आली आहे. ती मंजूर होताच तालुका प्रशासनाकडे मदत पाठवून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. 
- राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com