"ई-चलन' प्रणालीद्वारे रिक्षाचालकांची लूट 

"ई-चलन' प्रणालीद्वारे रिक्षाचालकांची लूट 

जळगाव : शहरात "ई-चलन' कार्यप्रणालीद्वारे बेशिस्त वाहन धारक, नियम मोडणाऱ्यांसाठी सिसीटिव्ही फुटेजद्वारे ट्रेकिंग करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईस सुरवात झाली. सोबतच वाहतूक विभागाने व्हॉटस्‌ऍपद्वारे ई-चलनाची कारवाई सुरु केली असून किरकोळ कारणांसाठी रिक्षाचालकांना चलन देऊन त्यांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी रिक्षाचालक करु लागले आहेत. 

पोलिसदलातर्फे जळगाव शहरात गेल्या महिन्या पासून ई-चलन कार्यप्रणाली कार्यान्वीत करण्यात आली. साडेपाच लाख लोकंसख्येच्या जळगाव शहरात केवळ पोलिसदलाचे 56 सिसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत आहेत. त्यात शहरातील 25 चौक कव्हर करण्यात आले आहेत. या कॅमेरांवर नजर ठेवण्यासाठी केवळ 2 तंत्रज्ञ नियुक्त असून सिग्नल मोडणारे, रॅश ड्रायव्हिंग आणि अपघाताच्या वेळी कारवाईसाठी या कॅमेरांचा निश्‍चितच फायदा होतो. 
वाहतूक विभागाने ई-चलन प्रणाली राबवण्यासाठी व्हॉटस्‌ऍप सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचा क्रमांकही सार्वजनिक करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या किंवा बेशिस्त वाहनधारकाचे दोन फोटो वाहतूक विभागाच्या व्हॉटस्‌ऍप क्रमांकावर टाकताच संबंधित वाहनधारकाला घरपोच ई-चलन पाठवले जाते. याच "व्हॉटस्‌ऍप' यंत्रणेचा आता कर्मचाऱ्यांकडूनच गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. 

ऑटोरिक्षा टार्गेटवर 
ई-चलन या प्रणालीद्वारे गेल्या महिनाभरात वाहतूक विभागाने अकराशे वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून 51 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत सर्वाधिक ई-चलन "व्हॉटस्‌ऍप' नंबरद्वारे जनरेट झालेले असल्याचे आणि तेही सर्व प्रवासी वाहतूकदार खास करुन ऑटोरिक्षा चालकांनाच दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
 
गुटखा-पाणी बॉटलसाठी चलन 
तक्रारदार ऑटोरिक्षा चालकांनी सांगितल्याप्रमाणे, ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची सरबराई करावी लागते. "दादा' ड्युटीवर आल्यावर त्यांना वेळीच पाण्याची बाटली, विमल गुटख्याची पुडी ठरलेली असते. सरबराई करणाऱ्यांचे व्यवस्थित सुरु असते. मात्र, नियमाने वागणाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी उभ्या रिक्षाचा मागून फोटो काढून तो, वाहतूक विभागाच्या व्हॉटस्‌ऍप नंबरवर टाकला जातो. त्यासाठी सहाशे ते दोन हजारांपर्यंतच्या दंडाची पावती येऊन धडकते. 7 दिवसांत दंड भरला नाही तर, खटला भरण्यात येतो परिणामी दंड भरावाच लागतो असेही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. 
 
इतर वाहनांना सूट 
विना नंबरप्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, सिग्नल तोडणारे, ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर शहरात कारवाई होणे अपेक्षित असताना व्हॉटस्‌ऍप नंबरवर केवळ रिक्षाचालकांचे फोटो टाकण्यात येतात. आजवर मुख्य बाजारपेठेत विनापार्किंगच्या जागेत उभ्या राहणाऱ्या महागड्या कार व इतर वाहनांवर कुठलीच कारवाई वाहतूक पोलिस करीत नाहीत, अशीही तक्रार रिक्षाचालक करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com