एकनाथराव खडसेंचे आता राजकीय संघर्षाचे नवे वळण 

एकनाथराव खडसेंचे आता राजकीय संघर्षाचे नवे वळण 

जळगाव : राजकीय जीवनात विरोधकांशी लढा देऊन पक्ष बळकटीसह गतीने विविध पदे घेत पुढे जात असतो. मात्र, याच गतीला कधीकधी पक्षातूनच "ब्रेक' लागतो. हे केवळ भाजपच्या एकनाथराव खडसेंच्या बाबतीत झाले असे नव्हे तर कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीतही घडले आहे. मुख्यमंत्रिपदाची दावेदारी असलेले खानदेशातील कॉंग्रेसच्या नेत्यांचे राजकीय बळ कमी करण्याचे त्यावेळीही प्रयत्न झाले. परंतु, त्यांनी संघर्षाला नवे वळण देऊन आपले अस्तित्व कायम ठेवले आणि ते भविष्यात चांगल्या पदावर गेल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपतील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीतील खडसेंचेही राजकीय बळ कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्यांच्याही संघर्षाचे वळण नवे असणार हेही आता निश्‍चित आहे. 
भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारण्यावर पक्षाने अधिकृत शिक्कामोर्तब केले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून आता खडसे बाहेर पडले आहेत. त्यातील एक समाधानाची बाब म्हणजे त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यामुळे आता खडसे यांचे राजकीय जीवन संपले असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे, हे निश्‍चित. कारण ज्या-ज्या वेळेस पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व स्थानिक नेतृत्वाला संपवून मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हे स्थानिक नेतृत्व संपत नाही. मात्र, त्यांच्या संघर्षाचा रस्ता बदलतात आणि आपले अस्तित्व सिद्द करतात. त्याला राजकीय भूतकाळ साक्षीदार आहे. 
कॉंग्रेस पक्ष एकेकाळी आजच्या भारतीय जनता पक्षाप्रमाणे मजबूत होता. त्यावेळीही त्या पक्षात पदासाठी चढाओढ असायची. त्यावेळी अशाच प्रकारे पदाची इच्छा असणाऱ्यांना डावलण्यात आले आहे. अगदी खानदेशचा विचार केल्यास एकेकाळी कॉंग्रेसमधून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी शिक्षणमंत्री (कै.) मधुकरराव चौधरी आणि धुळे येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील हे सुद्धा एकेकाळी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होते. परंतु, त्या-त्या वेळी पक्षाने त्यांना बाजूला केले आहे. प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्र विधिमंडळात कॉंग्रेसतर्फे विरोधी पक्षनेत्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा दावा होता. मात्र, त्यांना पक्षाने सोईस्करपणे बाजूला केले. कालांतराने कॉंग्रेसचे नेते (कै.) मधुकरराव चौधरी हे सुद्धा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, परंतु कॉंग्रेसने त्यांनाही सोईस्करपणे बाजूला केले होते. तर धुळे येथे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदासदाजी पाटील यांचा एकेकाळी कॉंग्रेसमध्ये दबदबा होता, त्यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांचेही पक्षातर्गंत राजकीय बळ कमी करण्यात आले. 
भारतीय जनता पक्षाने खडसे यांच्याबाबतीत तेच केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी फक्त मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने प्रथम मंत्रिपदावरून बाजूला करण्यात आले असण्याचे सांगण्यात आले. आता उमेदवारी नाकारून पक्षाच्या पदाच्या शर्यतीतून बाजूला करण्यात आले आहे. मात्र, भूतकाळात कॉंग्रेसकडून राजकीय जीवनात बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या नेत्यांचा अभ्यास केल्यास पक्षाने या नेत्यांचे राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला तरी पक्षाला ते साध्य झाल्याचे दिसून आले नाही. प्रतिभाताई पाटील कालांतराने राज्यपाल आणि राष्ट्रपती झाल्या. मधुकरराव चौधरी विधानसभेच्या सभापतिपदापर्यंत पोहोचले. धुळ्याचे कॉंग्रेसचे नेते रोहिदास दाजी पाटील आजही पक्षात राजकीय अस्तित्व टिकवून आहेत. त्याचे पुत्र कुणाल पाटील आमदार आहेत. पक्षाने राजकीय बळ संपविण्याचा प्रयत्न केला तरी या नेत्यांनी संघर्षाचे मार्ग बदलले त्याला यश मिळाले. मात्र, त्यांचे राजकीय अस्तित्व संपले नाही. कारण त्यांचा मूळ राजकीय पिंडच संघर्षाचा होता. खडसेही याच राजकीय मुशीतले आहेत. 

...अन कमळ फुलले! 
एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही भाजप बांधणी केली आहे. त्यांनी कॉंग्रेसविरुद्ध संघर्ष करून भाजपसाठी जमीन तयार केली आहे. त्याच जमिनीवर आज कमळाचे पीक भरभरून आल्याचे हे दिसून येत आहे. मात्र, पक्षाने त्यांना निवडणुकीच्या मैदानातून बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय जीवन संपले असे कोणाला वाटत असेल तर ती चूक ठरणार आहे. कारण संघर्षाचा मार्ग बदलून ते आपले अस्तित्व दाखवतील, हे मात्र निश्‍चित. अगदीच खडसेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास "कालाय तस्मै नम:' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com