नाथाभाऊंना पक्षाने विधानपरिषदेवर संधी द्यावी : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका 21 मे रोजी होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तीन जागा आहेत. त्या पैकी एका जागेवर माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांची निवड करण्यात यावी असा पक्षातून विचार व्यक्त होत आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी द्यावी असे मत माजी मंत्री व पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले आहे. 
राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका 21 मे रोजी होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तीन जागा आहेत. त्या पैकी एका जागेवर माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांची निवड करण्यात यावी असा पक्षातून विचार व्यक्त होत आहे. याबाबत प्रथम "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर काल एकनाथराव खडसे यांनी स्वतः: त्याला दुजोरा दिला व आपल्याला पक्षाने विधानपरिषदेवर संधी द्यावी असे मतही व्यक्त केले होते. त्यांनी यात म्हटले होते, की राज्यसभेसाठी पक्षश्रेष्ठींनी आपल्या नावाची शिफारस केली होती. मात्र त्यावेळी आपणच दिल्लीस जाण्यास नकार दिला होता. आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असल्याने आपल्याला विधानपरिषदेवर आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी आपण वरिष्ठांकडे केली आहे. 
भारतीय जनता पक्षात विधानपरिषदेसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत स्वतः: एकनाथराव खडसे यांनीच विधानपरिषदेसाठी आपल्याला संधी द्यावी असे मत व्यक्त केल्यामुळे भाजपच्या वरीष्ठांमध्येही आता त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. 
भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यात पक्षातर्गंत वाद आहेत. मात्र याबाबतीत गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, विधानपरिषदेवर पक्षाने नाथाभाऊंना निश्‍चित संधी दिली पाहिजे. ते आमचे अनुभवी नेते आहेत. जर त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली, तर पक्षाला निश्‍चित फायदा होणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाचा विचार केला पाहिजे. 
मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनीच खडसे यांना विधानपरिषदेवर घेण्याबाबत सहमती दर्शविली असल्याने पक्षात निश्‍चित आता निश्‍चित त्यांच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 11 मे रोजी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्यामुळे लवकरच उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. भाजपतर्फे आता खडसे यांना आमदारकीची संधी मिळणार काय? याकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse vidhan parishad bjp girish mahajan