खडसेंना कॉंग्रेसकडून विधान परिषदेची "ऑफर' 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

राज्यात विधान परिषदेची निवडणूक 21 मेस होत आहे. त्यासाठी 11 मेस उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, एकनाथराव खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे या पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असताना त्यांना डावलून नवीन चार जणांची नावे जाहीर केल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षाने विधानसभा आणि आता विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीपासून डावललेले माजी मंत्री एकनाथराव खडसे नाराज झाले आहेत. विधान परिषदेसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींवर निशाणाही साधला आहे. त्यामुळे ते पक्षांतराच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत विविध पक्षांतून त्यांना पुन्हा "ऑफर' येत असून कॉंग्रेसतर्फे त्यांना विधान परिषदेसाठी थेट "ऑफर' देण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु ही सहावी जागा असून, यासाठी त्यांना लढावे लागणार असून भाजपची मतेही फोडावी लागणार आहेत. परंतु सद्यःस्थितीत खडसे त्यासाठी तयार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. 
राज्यात विधान परिषदेची निवडणूक 21 मेस होत आहे. त्यासाठी 11 मेस उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, एकनाथराव खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे या पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असताना त्यांना डावलून नवीन चार जणांची नावे जाहीर केल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्यांचे समर्थकही नाराज झाले आहेत. 
एकनाथराव खडसे यांनी तर थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली, तसेच त्यांच्या कन्येला मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली अन्‌ त्यांचाही पराभव झाला. त्यानंतर त्यांना विधान परिषदेसाठी अपेक्षा होती, त्या ठिकाणीही पक्षाने त्यांना संधी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. अशा स्थितीत त्यांनी पक्षांतराचा निर्णय घ्यावा, असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. 
खडसे यांची भाजपमध्ये असलेली नाराजी लक्षात घेऊन इतर पक्षांनी त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. खडसेंचा प्रभाव मोठा आहे. शिवाय लेवा पाटीदार समाजासह ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे. राज्यात अनेक मतदारसंघांत ते प्रभाव करू शकतात. त्यामुळे ते पक्षात आल्यास त्यांचा त्या पक्षाला फायदा होऊ शकतो. 

कॉंग्रेसकडून ऑफर पण... 
एकनाथराव खडसे यांना कॉंग्रेसकडून थेट विधान परिषद उमेदवारीची "ऑफर' देण्यात आल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची चर्चा आहे. मात्र, खडसे यांना ही निवडणूक लढावी लागणार आहे. सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसतर्फे खडसेंची उमेदवारी असणार आहे. या जागेसाठी भाजपच्या उमेदवाराविरोधात खडसेंची लढत असेल. त्यासाठी त्यांना तब्बल 14 मतांची तजवीज करावी लागणार आहे. अर्थात भाजपचे तेवढे आमदार आपल्या बाजूला वळवावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांचा विजय होईल. 

खडसेंचा नकार 
कॉंग्रेसकडून थेट "ऑफर' आली असली, तरी खडसेंचा सद्यःस्थितीत नकार असल्याचीही चर्चा आहे. कारण ही "ऑफर' स्वीकारणे मोठे आव्हान असणार आहे. शिवाय आज भाजपमध्ये अनेक नाराज आहेत. "लॉकडाउन'च्या स्थितीत प्रत्येक आमदाराची भेट होणार नाही आणि केवळ फोनवर संपर्क करणे धोकादायक ठरेल. अशा स्थितीत सर्वच अवघड होईल आणि त्यात पराभव झाल्यास आणखी नामुष्की पदरी येईल. त्यामुळे कॉंग्रेस जर शाश्‍वत जागेवरच विधान परिषदेची "ऑफर' देत असेल, तर ती स्वीकारण्याची शक्‍यता आहे. मात्र भाजपकडून वारंवार अन्याय होत असल्याने खडसेंनी पक्षांतराचा निर्णय घ्यावा, याबाबत त्यांच्या समर्थकांकडून आग्रह होत आहे. परंतु कॉंग्रेस, "राष्ट्रवादी'ने त्यांना शाश्‍वत ऑफर दिल्यास निश्‍चितपणे पक्षांतर होऊ शकते. ते ज्या पक्षात जातील त्याला मोठा फायदा होईल. शिवाय खडसे यांचा सहकार क्षेत्रातही मोठा प्रभाव आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse vidhan parishad congress offer