सक्षम नेतृत्व असताना भाजप सुरेशदादांच्या दारी का? 

सक्षम नेतृत्व असताना भाजप सुरेशदादांच्या दारी का? 

जळगाव : महापालिका निवडणुकांची रणभेरी वाजली आणि जळगावात राजकीय वातावरण तापू लागले. विशेषतः भाजपमध्ये इच्छुकांची चांगलीच रणधुमाळी सुरू आहे. गेल्या काही दिवसांत एकमेकावर सडकून आरोप करणारे भाजप नेते एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी परस्परांची स्तुती करीत एकमेकांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे. पण, पक्षाकडे दिग्गज नेतृत्व असताना भाजप मात्र "युती' करून नेतृत्वासाठी सुरेशदादांच्या दारी ताटकळत का उभा आहे, असा प्रश्‍न भाजप कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

जळगावच्या राजकारणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व राहिले आहे. पालिका ते महापालिका अशा प्रवासात जैन यांच्या नेतृत्वाखालीच जळगावात सत्ता राहिली. मात्र, गेल्या काही दिवसांत पालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने त्यांना जोरदार विरोध केला. खडसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जैन यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान उभे केले होते. सन 2005 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने जैन यांच्या आघाडीच्या बरोबरीने 34 जागा मिळविल्या; तर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 30 वर्षे सुरेशदादा जैन यांच्याकडे आमदारकीच्या माध्यमातून असलेला जळगाव विधानसभा मतदारसंघही आपल्याकडे खेचून आणला. भाजपचे सुरेश भोळे हे तब्बल 43 हजार मतांनी विजयी होऊन आमदार झाले. त्यामुळे शहरात भाजपला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र, खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून भाजपत खडसे आणि महाजन यांचे गट निर्माण झाले. 

भाजपमध्ये खदखद 
महापालिका निवडणुका लागल्यानंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्‍न कार्यकर्त्यांनीच निर्माण केला होता. त्याला वरिष्ठांनी कोणतेही उत्तर दिले नाही. परंतु, भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध असताना पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी पक्षाचा कट्टर विरोध असलेल्या जैन यांच्या खानदेश विकास आघाडी व शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव ठेवला. जैन यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही या युतीला सहमती दर्शविली. मात्र, इकडे भाजप कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांमधील खदखद अधिकच वाढली आहे. 

संतप्त कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते खडसे व महाजन यांनी वेगवेगळी भेट घेऊन "युती नकोच' अशी मागणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खडसे यांनी ज्यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्याशी युती करणे आपल्या मनाला पटत नसल्याचे जाहीर केले. तसेच आपण महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तिकडे महाजनही खडसेंचे नेतृत्व मान्य म्हणून सांगतात. पण, त्यांनी युती न करण्याचा दिलेला सल्लाही ते सोईस्करपणे धुडकावतात, यामुळे संपूर्ण पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com