सामाजिक गणितावर उमेदवारांचे यशाचे आराखडे

सामाजिक गणितावर उमेदवारांचे यशाचे आराखडे

जळगावचे संस्थापक भोईटे घराणे असल्याची इतिहासात नोंद आहे. जळगावच्या राजकारणातही या घराण्याचा एकेकाळी दबदबा होता. पालिकेच्या राजकारणात घराण्यातील एक प्रतिनिधी नगरसेवक असायचा. मात्र, गेल्या वेळी तो अपवाद ठरला. त्यांच्या घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढविली नाही. परंतु यावेळी माजी नगराध्यक्षा लताबाई भोईटे भाजपतर्फे निवडणूक मैदानात आहेत. त्यामुळे त्यांचे पालिकेत पुनर्पदार्पण होईल काय? याची परीक्षा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी असलेले नीलेश पाटील यांनी ऐन निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या निवडणुकीपासून त्यांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न आहे. जनता त्यांना स्वीकारणार काय? हे निकालात दिसून येईल. प्रभाग क्र. 8 हा मराठा, गुजर आणि कोळी समाज बहुल असलेला भाग आहे. त्यामुळे उमेदवारांचे सामाजिक गणिताच्या आराखड्यावरच यश अवलंबून आहे. 
 
प्रभाग क्र. 8 मध्ये हिरा-शिवा कॉलनी, कृषी विद्यापीठ, निमखेडी गाव, आहुजानगर, जुने जैन पाइप फॅक्‍टरी, दादावाडी परिसर, भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर आणि प्रेमनगर असा परिसर आहे. यात निमखेडी गाव हा जुना भाग वळल्यास सर्व नवीन वसलेला भाग आहे. या प्रभागात मराठा समाजाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल गुजर आणि कोळी समाजाचा रहिवास आहे. त्यासोबत इतर समाजांचाही रहिवास आहे. सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या गणिताचे आराखडे उमेदवार दिले आहेत. 

"अ' गटात तिरंगी लढत 
प्रभागातील "अ' गटात मनोज सुरेश चौधरी (शिवसेना), राकेश जिजाबराव पाटील (भाजप) आणि राजेंद्र मोतीराम पाटील (राष्ट्रवादी) हे उमेदवार उभे आहेत. हे तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. मनोज चौधरी हे माजी नगरसेवक आहेत. सन 2008 मध्ये ते स्वतः नगरसेवक होते, 2010 मध्ये त्यांच्या पत्नी, तर आता पुन्हा ते निवडणूक मैदानात आहेत. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. गेल्या वेळी याच मतदारसंघातून त्यांच्या मातोश्रींनी निवडणूक लढविली होती. मात्र, त्या पराभूत झाल्या यावेळी ते स्वतः मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राजेंद्र मोतीराम पाटील निवडणूक लढवत आहेत. ते गुर्जर समाजाचे आहेत. गेल्या वेळी याच मतदारसंघातून त्यांच्या पत्नीने गुलाबराव देवकर यांच्या पत्नीविरुद्ध निवडणूक लढविली होती. त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांनी घेतलेल्या मतामुळे देवकरांच्या पत्नीचाही पराभव झाला होता. त्यामुळे ते उलटफेर करण्याची शक्‍यता आहे. परंतु गटातील तिरंगी लढत काट्याची होणार आहे. 

लताबाईंची पुनर्पदार्पणाची परीक्षा 
प्रभागातील "ब' गटात माजी नगराध्यक्षा लताबाई भोईटे भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. भोईटे जैन यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र, यावेळी प्रथमच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली आहे. लताबाई भोईटे यांनी गेल्या वेळी निवडणूक लढविली नाही. त्यामुळे यावेळी त्यांचे महापालिकेत पुनर्पदार्पण होईल काय याचीच परीक्षा आहे. याच गटातून शिवसेनेतर्फे कल्पना संतोष पाटील मैदानात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोमल नीलेश शिंदे आणि भाजपमधून बाहेर पडलेल्या पदाधिकारी जयश्री बोरसे "अपक्ष' आहेत. 

"क' गटात तिरंगी लढत 
"क' गटात स्नेहा संदेश भोईटे (शिवसेना), प्रतिभा सुधीर पाटील (भाजप), नीता मंगलसिंग सोनवणे (राष्ट्रवादी) अशी तिरंगी लढत आहे. शिवसेनेच्या स्नेहा भोईटे या माजी नगरसेवक संदीप भोइटे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रभाग परिचित आहे. सुधीर पाटील यांनी गेल्या वेळीही याच प्रभागातून निवडणूक लढविली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी त्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात आहेत. तर "राष्ट्रवादी'च्या नीता मंगलसिंग सोनवणे या आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या चुलत भगिनी आहेत. त्यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु त्यांनी प्रभागात संपर्क कायम ठेवला. त्यामुळे यावेळी त्यांना यश मिळेल का? हा प्रश्‍न आहे. 

नीलेश पाटील आजमावताय नशीब 
"ड' गटात एकूण सात उमेदवार आहेत. यात शिवसेनेतर्फे नीलेश सुधाकर पाटील यांची उमेदवारी आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आहेत. ऐन निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या वेळीही त्यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र, माघार घेतली. यावेळी ते मैदानात आहेत. त्यामुळे त्यांची नगरसेवक होण्याची इच्छा जनता पूर्ण करणार का? याचीच परीक्षा आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपतर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील मैदानात आहेत. त्यांचे धरणगावजवळील चिंचपाडा येथे शिवाजी आबाजी पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. शिवाजी पाटील हे मूळ कॉंग्रेसचे आहेत. त्यांचे पुत्र डॉ. चंद्रशेखर पाटील जळगाव महापालिकेच्या राजकारणात प्रथमच जनतेचा कौल मागत आहेत. पालिका निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी या गटात मात्र दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहेत. कॉंग्रेसतर्फे ताराचंद चौधरी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्वप्नील प्रकाश नेमाडे मैदानात आहेत. याशिवाय नितीन तुळशीराम जाधव, अनिल भाऊराव पाटील, रोहिणी प्रकाश पाटील हे "अपक्ष' उमेदवार मैदानात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com