रात्री वैऱ्याची.. लक्ष्मीदर्शनाची..!
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी पैसेवाटप होत असल्याची तक्रार सोमवारी समोर आलेली असताना जाहीर प्रचार संपल्यानंतर अशा स्वरूपाच्या गैरप्रकारांना मोठा ऊत येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभागातील उमेदवारांच्या "क्षमते'नुसार फुलीचा भाव ठरला असून प्रचार संपल्यानंतरच्या "दोन्ही रात्री वैऱ्याच्या आहेत... लक्ष ठेवा.. लक्ष्मीदर्शनाची संधी आहे..' असे सूरही दबक्या आवाजातून ऐकू येत आहेत.
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी पैसेवाटप होत असल्याची तक्रार सोमवारी समोर आलेली असताना जाहीर प्रचार संपल्यानंतर अशा स्वरूपाच्या गैरप्रकारांना मोठा ऊत येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभागातील उमेदवारांच्या "क्षमते'नुसार फुलीचा भाव ठरला असून प्रचार संपल्यानंतरच्या "दोन्ही रात्री वैऱ्याच्या आहेत... लक्ष ठेवा.. लक्ष्मीदर्शनाची संधी आहे..' असे सूरही दबक्या आवाजातून ऐकू येत आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (ता.1) मतदान होत असून, त्यासाठीचा जाहीर प्रचार आज सायंकाळी पाच वाजता संपला. जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून सोमवारी रात्री, मंगळवारी दिवसभर व रात्रीही छुपा प्रचार सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे. या छुप्या प्रचारात मतदारांना वेगवेगळ्या स्वरूपाची प्रलोभने दिली जातील. काही भागांमध्ये थेट लक्ष्मीदर्शन घडवले जाईल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
कार्यकर्त्यांचे नियोजन
गेल्या दहा-बारा दिवसांपासून भल्यामोठ्या प्रभागात फिरून दमछाक झालेल्या उमेदवार, त्यांचे नेते व समर्थकांना आज प्रचार संपल्यानंतर उसंत मिळाली. मात्र, सायंकाळी प्रचार संपल्यानंतर कार्यकर्ते व समर्थकांचे वेगळेच नियोजन सुरू झाल्याचे दिसत होते. ठिकठिकाणी उमेदवारांच्या निवासस्थानी, संपर्क कार्यालयात मतदान कसे करवून घ्यायचे, याचे "ट्रेनिंग' त्यासाठीच्या सूचना, मार्गदर्शन असे प्रकार सुरू होते. बुधवारी मतदानाचा दिवस असल्याने त्यादृष्टीने आपल्या उमेदवारास अधिकाधिक मतदान कसे होईल, याबाबत सूक्ष्म नियोजनावरही भर देण्यात येत आहे.
लक्ष्मीदर्शनाचे नियोजन
प्रभाग क्रमांक आठमधील महाराणा प्रताप विद्यालयाच्या परिसरात आज एका उमेदवाराच्या संस्थेतील शिक्षक पैसे वाटत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. असे प्रकार आता दोन दिवस आणखी समोर येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीत तर पैसेवाटपाचे प्रकार सर्रास होतात. मात्र, त्यावर कुठे कारवाई होताना दिसत नाही. कारण, पैसे वाटपाच्या प्रकारात अलीकडे उमेदवारांचे समर्थक भलतेच हुशार झाले असून, कुणाला समजणारही नाही, अशा पद्धतीने नियोजनबद्ध पैसेवाटप केले जाते.
रात्री वैऱ्याची..
अशाप्रकारचे नियोजन साधारणत: रात्रीच होत असते. शहरातील गोंधळाचा धुराळा थंडावल्यावर रात्री उमेदवारांचे समर्थक नियोजन करतात. त्यामुळे प्रतिस्पर्धी प्रत्येक उमेदवारासाठी ही रात्री वैऱ्याची असते. एकतर स्वत:चे काम पूर्ण करायचे, तसे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे, अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते. काही भागात मतदार तर याच प्रलोभनाची वाट पाहत असतात. त्यामुळे लक्ष्मीचा चमत्कार दाखविल्याशिवाय "नमस्कार' घालणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या मतदारांकडे लक्ष्मीदर्शन लवकर घडून येत असते.
पोलिसांची करडी नजर
प्रत्येक निवडणुकीत असे प्रकार घडत असतात. पोलिसांचा रात्रभर कडा पहारा असतो, गस्तही चालू असते. परंतु, या गस्तीत हे प्रकार समोर येतील, ही शक्यता कमीच. तरीही आयोगाच्या आदेशानुसार व प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांनुसार गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, आयोगाचे अधिकारीही लक्ष ठेवून आहेत. त्यांची "करडी नजर' या अर्थपूर्ण व्यवहारांवर असल्याचे सांगितले जात आहे.