निवडणुकीच्या माध्यमातून कोटींची उलाढाल!

निवडणुकीच्या माध्यमातून कोटींची उलाढाल!

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरते का होईना, अर्थचक्र फिरू लागले असून, प्रचारात सहभागी कार्यकर्ते, त्यांच्या व्यवस्थेसह प्रचारसाहित्य व अन्य विविध घटकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. परिणामी, बाजारपेठेतही पैसा फिरणार असल्याचे मानले जात आहे. 
लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तर नियमितपणे कोणत्या ना कोणत्या निवडणुका होत असतात. गेल्या काही वर्षांत या निवडणुका कोट्यवधींच्या उलाढालीचे माध्यम ठरतात. अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचारापर्यंत आणि मतदानापासून निकालापर्यंत सर्वच गोष्टी पैशांच्या "तराजू'त मोजल्या जातानाचे सध्याचे चित्र आहे. महापालिका निवडणूकही त्याला अपवाद कशी असेल? 

जळगाव कोटींच्या उलाढालीचे केंद्र 
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली असताना, सध्या जळगाव शहर कोटींच्या उलाढालीचे प्रमुख केंद्र बनले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून म्हणजे, अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया व आता उमेदवारांचा प्रचारप्रक्रियेतही दररोज प्रत्येक प्रभागात लाखोंची उलाढाल होत आहे. निवडणूक खर्चाबाबत आयोगाने मर्यादा ठरवून दिलेली असताना, त्यापलीकडे जाऊन खर्च होतो, हे उघड गुपित आहे आणि ते सामान्य लोकांपासूनही लपून राहिलेले नाही. 

महिलांचाही रोजंदारीवर प्रचार 
निवडणुकीत उमेदवारांना सर्वाधिक गरज पडते ती कार्यकर्ते, समर्थकांची. सध्या उमेदवारांचा प्रचारफेऱ्यांवर भर असून, प्रभागात व्यक्तिगत भेटीगाठींवर ते भर देत आहेत. हक्काच्या कार्यकर्त्यांसह काही महिलांनाही सोबत घेतले जात असून, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. पन्नास-शंभर रुपये रोजाने घरकाम करणाऱ्या महिलांना या उमेदवारांकडून दोनशे ते तीनशे रुपये रोज मिळत असल्याने त्यांची पावले प्रचाराकडे वळली आहेत. त्यामुळे मालकीण बायांचाही संताप होत असल्याचे चित्र आहे. रोजंदारीवर अन्य ठिकाणी जाणारी पुरुष मंडळीही आपल्या प्रभागातील उमेदवारांच्या मदतीला हात देत त्यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसते. एकूणच या लोकांची सध्या चंगळ असून, उमेदवारांचीही गरज भागत असल्याने दोन्ही समाधानी आहेत.  

डिजिटल प्रिंटिंग जोरात! 
उमेदवारांनी प्रचारासाठी पत्रके, फलक, मोठे होर्डिंग्ज, चित्ररथांचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी शहरातील डिजिटल प्रिंटिंग प्रेस सध्या जोमात आहेत. प्रत्येक डिजिटल प्रिंटिंग प्रेसकडे मोठमोठ्या व आठ-दहा दिवसांच्या ऑर्डर येऊन पडल्या आहेत. मात्र, नेमकी किती उलाढाल होते, याबाबत कुणी बोलायला तयार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com