निम्मे जळगाव "संवेदनशील' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

जळगाव ः गेल्या काही निवडणुका, उत्सव आणि एकूणच शहरातील ठराविक भागांमधील स्थिती पाहता या महापालिका निवडणुकीसाठी निश्‍चित 469 पैकी तब्बल 146 केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे जवळपास निम्म्या शहरात पोलिसांना अतिरिक्त कुमक ठेवून विशेष बंदोबस्त राखावा लागणार आहे. 

जळगाव ः गेल्या काही निवडणुका, उत्सव आणि एकूणच शहरातील ठराविक भागांमधील स्थिती पाहता या महापालिका निवडणुकीसाठी निश्‍चित 469 पैकी तब्बल 146 केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे जवळपास निम्म्या शहरात पोलिसांना अतिरिक्त कुमक ठेवून विशेष बंदोबस्त राखावा लागणार आहे. 
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी एक ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली जशा गतिमान झाल्या तशी प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. त्यातलाच भाग म्हणून पोलिस विभागाच्या अहवालानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांचा अहवाल जारी केला. 

एकूण 469 केंद्रे 
महापालिका निवडणुकीसाठी जळगाव शहरात 469 मतदान केंद्रे आहेत. यातील 146 मतदान केंद्रे संवेदनशील-अतिसंवेदनशील असल्याचा अहवाल पोलिस प्रशासनाने महापालिका प्रशासनाला दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर जादा पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 

केंद्रांना वाद, हाणामारीची पार्श्‍वभूमी 
महापालिका प्रशासनाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची पोलिस प्रशासनाकडून माहिती मागविली होती. शहरातील काही मतदान केंद्रांवर यापूर्वी गोंधळ निर्माण होऊन वाद-विवाद, तणाव, निर्माण झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. यात 146 मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवेदनशील असल्याचा अहवाल पोलिस प्रशासनाने दिला आहे. संमिश्र वस्ती, तुल्यबळ लढत, राजकीय शत्रुत्व, जाती दंगल या कारणांमुळे संवेदनशील मतदान केंद्र असल्याचे सांगण्यात आले. 

सर्वाधिक एमआयडीसी हद्दीत 
एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील बहुतांश भाग संवेदनशील मानला जातो. तांबापुरा, मेहरुण, अक्‍सानगर, मास्टर कॉलनी, सुप्रिम कॉलनी, सिंधी कॉलनी यांसह अयोध्यानगर, रामेश्‍वर कॉलनी, इच्छादेवी चौक अशा मोठ्या भागांना जातीय दंगली, हाणामारी, टोळीतील वैर या घटनांची पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे या ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 50 केंद्रे संवेदनशील-अतिसंवेदनशील प्रकारातील आहेत. 

संवेदनशील-अतिसंवेदनशील केंद्रे अशी 
एमआयडीसी पोलिस ठाणे हद्द : 50 
शहर पोलिस ठाणे : 32 
जिल्हापेठ पोलिस ठाणे : 10 
शनिपेठ पोलिस ठाणे : 24 
रामानंदनगर पोलिस ठाणे : 30 

 

Web Title: marathi news jalgaon election center