आम्ही करू विकास, करा योग्य व्यक्‍तीची निवड! 

आम्ही करू विकास, करा योग्य व्यक्‍तीची निवड! 

जळगाव ः एकेकाळी नाशिक, औरंगाबादच्या पुढे असणाऱ्या जळगावचा विकास थांबला आहे. जळगावकरांना रस्ते, पाणी, वीज, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत. याला कारणीभूत सत्तेतील पक्ष जबाबदार असून, परिवर्तन झाल्याशिवाय सुविधा मिळू शकणार नाहीत. महापालिकेत सत्तेत कोणाला आणायचे, हे नागरिक ठरवतील. पण, ज्या पक्षाचे विचार चांगले आहेत, त्यांना निवडून द्या. यापलीकडे जाऊन योग्य व्यक्‍तीला मत देऊन निवडून आणा. तरीही आम्हाला निवडून द्या, शहराचा विकास आम्ही करणार, असाच दावा "रोटरी जळगाव वेस्ट'तर्फे आज आयोजित चर्चासत्रातून राजकीय पक्षांकडून करण्यात आला. 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "रोटरी जळगाव वेस्ट'तर्फे आज मायादेवीनगरातील रोटरी भवनात "माझं जळगाव, माझी भूमिका' या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात आमदार सुरेश भोळे (भाजप), माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), माजी महापौर नितीन लढ्ढा (शिवसेना) व डॉ. राधेश्‍याम चौधरी (कॉंग्रेस) यांचा सहभाग होता. याप्रसंगी "रोटरी वेस्ट'च्या अध्यक्षा संगीता पाटील, सचिव राजेश परदेशी उपस्थित होते. गनी मेमन यांनी मुख्य सूत्रधार म्हणून काम पाहिले. 

भ्रष्टाचार अन्‌ ठेकेदारीमुक्‍त महापालिका करणार 
डॉ. राधेश्‍याम चौधरी (कार्याध्यक्ष, कॉंग्रेस) ः महापालिकेने रस्ते, वीज, पाणी, गटारी या मूलभूत सोयी-सुविधा पुरवून कर्तव्येही प्रामाणिकपणे पार पाडायला हवीत. यानंतर उद्यान, उड्डाणपूल, विमानतळ यांसारख्या विकासकामांना चालना मिळायला हवी; परंतु जळगावकर मूलभूत सोयी-सुविधांनाही भुकेले आहेत. शहरात जलवाहिनी टाकण्यासाठी जितका खर्च झाला असेल, तितकाच खर्च गेल्या बारा वर्षांत दुरुस्तीवर झाला आहे. आज महापालिकेच्या शाळा बंद, उद्यानांसह रुग्णालये "एनजीओं'ना दिली जात आहेत. लोकसहभागातून हे सर्व कामे होत असतील, तर ही जळगावसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. सर्व ठेके नगरसेवकांचे आहेत. यामुळेच महापालिकेवर 30 वर्षे सत्ता करणाऱ्या खानदेश विकास आघाडी/शिवसेनेवर जनतेचा रोष आहे. मूलभूत सुविधा न मिळण्यास भाजप आणि शिवसेना समान गुन्हेगार आहेत. आम्ही सत्तेत नसताना समांतर रस्त्यांसाठी लढलो. सत्तेत आलो तर आमचा नगरसेवक भ्रष्टाचार करणारा नसेल. मूलभूत सुविधांसोबत बंद पडणाऱ्या उद्योगांना चालना देऊ. महिला सुरक्षेसाठी प्रयत्न आणि ठेकेदारी व भ्रष्टाचारमुक्‍त महापालिका करण्यात येईल. 

सत्ता द्या, विकास निश्‍चित 
गुलाबराव देवकर (माजी पालकमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस) ः महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 48 उमेदवार दिले आहेत. आता सत्तेत असलेल्यांवर जनतेची नाराजी व्यक्‍त होऊ लागली आहे. नव्या कॉलन्यांमध्ये रस्ते नाहीत. आरोग्य, पाणी यांचे प्रश्‍नदेखील गंभीर आहेत. शहरातील 75 टक्‍के परिसर दुर्लक्षित आहे. यामुळे जनतेचा रोष आहे. याच कारणांमुळे सत्तेतील खानदेश विकास आघाडी/शिवसेनेचे उमेदवार अजून कॉलन्यांमध्ये पोचलेले नाहीत, अशी परिस्थिती जळगावमध्ये कधीच नव्हती. भाजप व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी जळगावला विकासापासून दूर ठेवले. राज्यात सत्तेत आलेल्या भाजपने ठरविले असते, तर निश्‍चित विकास झाला असता. मी पालकमंत्री असताना जळगावात नाट्यगृह, लांडोरखोरीचा विकास, पाणी योजनांसाठी निधी आणला होता. चार वर्षांत भाजपने मदत करण्याचा प्रयत्न केला असता, तर अशी बकाल परिस्थिती निर्माण झाली नसती. आम्हाला जेव्हा सत्ता मिळाली, तेव्हा सातत्याने पुढे येऊन काम केले. महापालिकेत एकदा सत्ता द्या, निश्‍चित विकास करू. असे केले नाही, तर पुढील निवडणुकीत फिरू देऊ नका. 

"सिंगापूर' नाही; पण मूलभूत सुविधा देणार 
आमदार सुरेश भोळे (भाजप) ः महापालिकेत सत्ता कोणाची येणार, हे काळच ठरविणार आहे. जनतेच्या सहभागातून विकासासाठी काम करायचे आहे. आरोप करण्यापेक्षा विकास कसा करता येईल, यावर विचार हवा. शहराचा विकास करायचा असेल, तर निधी हवा आणि निधी आणण्यासाठी सत्तेत येणे आवश्‍यक आहे. यामुळेच आतादेखील नियोजन समितीतून जे शक्‍य असेल ते करत आहे. शासनाने 25 कोटी मूलभूत विकासासाठी दिला होता. जिथे कामे झालेली नाहीत, तेथे तो वापरायचा होता. त्यानुसार यादी तयार केली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी अंतिम यादी दाखविली नाही आणि भाजपच्या नगरसेवकांना कमी निधी देऊन आमच्यातच भांडण लावले. पण, आम्हाला विश्‍वासात घेतले असते, तर आणखी 50 कोटी निधी मिळाला असता. आज महापालिका कर्जाच्या बोजाखाली आहे. त्यामुळे कर्जमुक्‍ती झाल्याशिवाय विकास होणार नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला सत्ता द्या, वर्षभरात जळगावचा विकास करू. जळगावचे "सिंगापूर' नाही, पण मूलभूत सुविधा निश्‍चित देऊ. 

भाजपकडून दिशाभूल 
नितीन लढ्ढा (माजी महापौर, शिवसेना) ः एकेकाळी जळगाव नावारूपाला होते. आशिया खंडात नसलेली "सतरा मजली' जळगावात उभी राहिली. ही परिस्थिती 1995 पर्यंत सुरळीतपणे सुरू होती. कर्ज महापालिकेवरच नाही, तर राज्य शासनावरदेखील आहे. कारण, कर्ज घेऊन विकास करणे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. 2001 मध्ये महापालिकेच्या विकासाला "ग्रहण' लागले, ते आजपर्यंत सुटलेले नाही. 2012 मध्ये "हुडको'चे कर्ज 129 कोटी होते. याबाबत राज्य शासनाने हमी घेतली होती. त्यावेळी 80 ते 90 कोटी महापालिकेने भरून "वन टाइम सेटलमेंट' करण्याचे ठरले होते. पण, हे होऊ शकले नाही. तसेच 2012 मध्ये "रेडिरेक्‍नर'नुसार 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर गाळे देण्याचा ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र, भाजपने व्यापाऱ्यांची दिशाभूल करून राज्य शासनाकडे ठराव विखंडित करण्यासाठी पाठविला. सत्तेत येण्यासाठी भाजपने गाळेधारकांना दिलेले आश्‍वासन पूर्ण होऊ शकणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत व्यापाऱ्यांकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी जमा केला. पण, आमच्या नेत्यांवर विश्‍वास ठेवून महापालिकेत पुन्हा आम्हाला सत्ता दिली. गाळेधारकांची दिशाभूल केल्यानंतर आता घरकुलाचे कर्ज माफ करणार, असे सांगून जळगावकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पण, आम्हीही सरकारमध्ये निम्मे मालक आहोत. एक वर्षानंतर भाजप सत्तेत राहते की नाही, हा प्रश्‍न असून, हे जळगावचा विकास कसा करणार? 

जलसंपदामंत्र्यांचा "व्हिडिओ'द्वारे संवाद 
"रोटरी'तर्फे आयोजित चर्चासत्राला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते; परंतु मुंबई येथे बैठक असल्याने मंत्री महाजन चर्चासत्रात सहभागी होऊ शकले नाहीत. तरीदेखील "रोटरी'ने तयार केलेल्या "व्हिडिओ'च्या माध्यमातून मंत्री महाजन यांनी संवाद साधला. यात त्यांनी महापालिकेत सत्ता देऊन एका वर्षात जळगावचा चेहरा बदलविणार. कर्जाचा डोंगर जास्त असल्याने जळगावचा विकास नाही. स्वच्छतेसह गाळेधारकांचा प्रश्‍न आहे. यामुळे जळगावकर हवालदिल आहेत. महापालिकेवरील कर्जाचा बोजा काढायचा असेल, तर भाजपला एकहाती सत्ता द्या. वर्षभरात बेरोजगारी, एमआयडीसीत सुविधा, आरोग्य सुविधा यांसह अन्य विकास केला नाही तर विधानसभेत मत मागायला येणार नसल्याचे मंत्री महाजन यांनी म्हटले. 

गाळेधारक, हॉकर्स संतप्त 
चर्चासत्रात नागरिकांच्या प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रमदेखील झाला. यात गाळेधारक व हॉकर्सकडून नितीन लढ्ढा यांना काही प्रश्‍न उपस्थित केले. यात प्रामुख्याने राजेश जवाहरानी यांनी गाळेधारकांचा प्रश्‍न मांडून आगामी काळात आम्हाला जागा मिळेल की नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला; तर हॉकर्स प्रतिनिधींकडून "फेरीवाला धोरणा'ची अंमलबजावणी का झाली नाही? यासह प्रश्‍नांचा भडिमार केला. यानंतर श्री. लढ्ढा यांनी काही प्रश्‍नांची उत्तरे दिली. मात्र, पूर्ण प्रश्‍नांची उत्तरे न देता हॉलमधून निघून घेल्यानंतर गाळेधारक व हॉकर्सनी येथे संतप्त भावना व्यक्त केल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com