कॉंग्रेसची "विनाश काले विपरीत बुद्धी' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

जळगाव ः राज्य आणि देशात कॉंग्रेसची गेल्या लोकसभा निवडणुकीत पार दैना उडाली. तरीही पक्षातील नेत्यांची धुंदी काही उतरलेली दिसत नाही. एक एक करून अनेक नेते राज्यातील कॉंग्रेस धुरिणांना कंटाळून पक्ष सोडून गेले, पण या नेत्यांना त्याच्याशी घेणेदेणे नाही. आता उरलीसुरली कॉंग्रेसही संपविण्याच्या मार्गावर त्यांची पाऊले पडताना दिसत आहेत. म्हणूनच आधी जिल्ह्यात 11 पैकी केवळ रावेर आणि जळगाव शहरच्या जागेवर त्यांनी आघाडी करताना समाधान मानले. आता तर जळगावही राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे षडयंत्र कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी रचल्याचे दिसत आहे.

जळगाव ः राज्य आणि देशात कॉंग्रेसची गेल्या लोकसभा निवडणुकीत पार दैना उडाली. तरीही पक्षातील नेत्यांची धुंदी काही उतरलेली दिसत नाही. एक एक करून अनेक नेते राज्यातील कॉंग्रेस धुरिणांना कंटाळून पक्ष सोडून गेले, पण या नेत्यांना त्याच्याशी घेणेदेणे नाही. आता उरलीसुरली कॉंग्रेसही संपविण्याच्या मार्गावर त्यांची पाऊले पडताना दिसत आहेत. म्हणूनच आधी जिल्ह्यात 11 पैकी केवळ रावेर आणि जळगाव शहरच्या जागेवर त्यांनी आघाडी करताना समाधान मानले. आता तर जळगावही राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे षडयंत्र कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी रचल्याचे दिसत आहे. ही पक्षाला गाडून टाकण्याची "विनाश काले विपरीत बुद्धी'च असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

भाजपने 2014 मध्ये राज्य आणि देशातील सत्ता काबीज केली आणि पंधरा वर्षे सत्ता भोगलेले कॉंग्रेस नेते पाच वर्षांपासून सैरभैर झाले. अशातही काही पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. जळगाव शहरात तर वीस वर्षांपासून कॉंग्रेसची गट-तटांमुळे फरफट झाली आहे. केवळ पक्ष आहे, पण कार्यकर्ते नाही अशी जिल्ह्यातील कॉंग्रेसची अवस्था असताना निवडक कार्यकर्ते पक्षाच्या झेंड्याखाली जोमाने काम करत राहिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेसला जळगाव शहरासाठी उमेदवारही सापडत नसताना डॉ. राधेश्‍याम चौधरी यांना ऐनवेळी तयार करण्यात आले होते. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पण, कोणतीही तयारी नसताना ते मैदानात उतरले, हे त्याचे कारण होते. पराभूत झाल्यापासून मात्र त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात पाच वर्षे संघर्ष केला. शहरातील समस्यांवर ते सातत्याने सत्ताधाऱ्यांशी भांडत आले. पक्षाच्या झेंड्याखाली अल्पसंख्याक, दलित आणि सर्व जातिधर्माचे लोक असे येतील, या दृष्टीने ते काम करीत राहिले. यातूनच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जोमाने उतरण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली होती. 

पण, राज्यातील आघाडीच्या जागा वाटपात कॉंग्रेसने राष्ट्रवादीपुढे सपशेल लोटांगण घालत जिल्ह्यातील केवळ दोन जागा लढविण्याचा प्रस्ताव मान्य केला. जळगाव शहर आणि रावेर या जागांवर पक्षाच्या नेत्यांनी समाधान मानले होते. पण, आता यातूनही जळगाव शहरच्या जागेवर पाणी सोडण्याची तयारी कॉंग्रेस नेत्यांनी दाखविली आहे. म्हणूनच जळगाव शहर येथून कधीही चर्चेत नसलेले राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याचाच अर्थ जिल्हा आणि शहरात कॉंग्रेसला पाच वर्षे आंदोलनांच्या माध्यमातून जिवंत ठेवणारे निष्ठावंत डॉ. राधेश्‍याम चौधरी यांचा उमेदवारीतून पत्ता कापण्याची तयारी कॉंग्रेस नेत्यांनी केल्याचे दिसत आहे. राज्यभर कॉंग्रेस नेत्यांनी असाच उपटसुंभ कारभार करून पक्ष रसातळाला नेला, आता निवडणुकीच्या तोंडावर पाच वर्षी सातत्याने लोकांमध्ये मिसळलेल्या जनहिताच्या प्रश्‍नांवर भांडणाऱ्या निष्ठावंतांनाच उमेदवारी टाळत पक्ष संपविण्याच्या मार्गावर त्यांची पावले पडताना दिसत आहेत. 
..... 

अभिषेक पाटील आले कुठून? 
जळगाव शहरात आमदार राजूमामा भोळे यांच्याविरुद्ध दंड थोपटणारे कॉंग्रेस कार्यकर्ते सातत्याने लोकांच्या प्रश्‍नांवर भांडत राहिले, संघर्ष करत राहिले. त्याचे नेतृत्व डॉ. चौधरी यांनीच केले. त्यावेळी अभिषेक पाटील नावाचा माणूसही जळगावकरांना माहीत नव्हता. आता अचानक श्री. पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आल्याने हे अभिषेक पाटील आहेत तरी कोण? असा प्रश्‍न कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याने कॉंग्रेसने जळगावची हाती आलेली जागाही राष्ट्रवादीला अर्पण केली की काय, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहेत. असे झालेच तर कॉंग्रेसमुक्त जळगाव जिल्हा करण्याच्या दृष्टीनेच कॉंग्रेस नेत्यांचेच हे षडयंत्र असल्याचे हे संकेत आहेत, अशा संतप्त भावना उरल्यासुरल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election congress city