भाजप महापालिकेत विजयाचा इतिहास रचेल : गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

जळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहरात कोणताही विकास झालेला नाही. साध्या मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता त्रस्त नागरिकांसमोर भाजप हाच पर्याय असल्याने महापालिका निवडणुकीत पक्ष मोठा विजय मिळवून इतिहास रचेल, असा विश्‍वास जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी 
आज व्यक्त केला. 

जळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहरात कोणताही विकास झालेला नाही. साध्या मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता त्रस्त नागरिकांसमोर भाजप हाच पर्याय असल्याने महापालिका निवडणुकीत पक्ष मोठा विजय मिळवून इतिहास रचेल, असा विश्‍वास जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी 
आज व्यक्त केला. 
भारतीय जनता पक्षातर्फे महापालिका निवडणुकीत सर्व 19 प्रभागांतील 75 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यांचा व पदाधिकाऱ्यांच्या ब्राह्मण सभेत आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर, श्रीराम खटोड आदी व्यासपीठावर होते. विशाल त्रिपाठी यांनी प्रास्ताविक केले. 
मंत्री महाजन म्हणाले, की जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप विजयाचा इतिहास रचणार आहे. आज जनतेचा ओढा भाजपकडेच आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेतील सत्ता भाजपकडेच येईल, याबाबत आता मनात कोणतीही शंका नाही. 

वर्षभरात शहराचा विकास करू 
मंत्री महाजन म्हणाले, की आमच्या हातात महापालिकेची सत्ता आल्यास आम्ही पाच वर्षे विकासासाठी थांबणार नाही. केवळ एका वर्षात आम्ही विकास करू. जळगाव शहराला आम्ही कर्जमुक्त करणार आहोत. पुढे एका वर्षाने राज्यात विधानसभा निवडणूकही आहे. त्यावेळी आम्ही केलेला विकास जनतेला दाखवू. 

युती झाली नाही, यातच यश ः भोळे 
आमदार भोळे म्हणाले, की जळगावात भाजप-शिवसेनेची युती होऊ नये, हीच कार्यकर्त्यांची इच्छा होती. युती झाली नाही, त्यामुळेच मोठे यश पक्षाला मिळणार आहे. या देशात गांधी, ठाकरे यांची घराणेशाही आहे. तशी ती भाजपमध्ये नाही. म्हणूनच एक चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान झाला. गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विकास तर केलाच; शिवाय देशाचेही नाव जगात उंचावले आहे. जळगावात भाजपची सत्ता आल्यास आम्ही विकास तर करणारच आहोत. परंतु देशाचा लौकिक वाढेल, असे चांगले कार्यही करू. 

भाजप सर्व जागा जिंकेल ः वाघ 
जिल्हाध्यक्ष वाघ म्हणाले, की जळगाव महापालिकेत भाजपने सर्व 75 जागा लढविल्या असल्याने आज जळगावकरांना विकासाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. या सर्व जागा भाजप जिंकून महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावेल आणि शहराचा चांगल्या पद्धतीने विकास करेल. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

Web Title: marathi news jalgaon election histoty girish mahajan