खडसेंना शह देण्याच्या खेळीत जैनांचीच कोंडी..! 

खडसेंना शह देण्याच्या खेळीत जैनांचीच कोंडी..! 

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मैत्रीतून भाजप-सेना युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात जैन यांच्या नेतृत्वाखाली "खाविआ' स्वतंत्र ठेवून त्या मार्फतही उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी होती. मात्र, "मातोश्री'वरून शिवसेनेच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा आदेश आल्यामुळे भाजप-सेना "युती' झाली खरी; पण यामुळे महापालिकेतील जैन यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या "खाविआ'चे अस्तित्वच नष्ट होणार आहे. तसेच पदाधिकारी निवडीबाबत त्यांचे असलेले अधिकारही संपुष्टात येणार असून, चिन्हावर लढल्यामुळे ते "मातोश्री'कडे जाणार आहेत. त्यामुळे युती करून खडसेंना शह देण्याच्या खेळीत जैन यांचीच आता कोंडी झाली आहे. परिणामी आता जागा वाटपाच्या प्रश्‍नावर युती फिस्कटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

श्री. खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारणाने मोठे वळण घेतले आहे. भाजपत खडसे आणि महाजन यांचे उघड-उघड दोन गट आहेत. दोन्ही गट शह-काटशहाचे राजकारण करीत आहेत. महापालिका निवडणुकीत गेल्या तीन टर्मपासून खडसे हेच भाजपचे नेतृत्व करीत आहेत; तर समोर विरोधी पक्ष म्हणून जैन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष किंवा आघाडी असते. एकेकाळी भाजपचे सामर्थ्य नसतानाही खडसेंनी शहरात राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेल्या जैन यांच्या विरोधात लढाई देत थेट नगराध्यक्षपद भाजपकडे खेचले होते. आज केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे स्वतंत्र लढल्यास भाजपला मोठे यश मिळेल, असा विश्‍वास कार्यकर्त्याचा होता. शिवाय खडसे यांनी नेतृत्व केल्यास त्यांच्या आक्रमकतेचा अधिक फायदा होणार, अशीही अपेक्षाही होती. 

मंत्री महाजन यांनी मात्र या सर्वच अपेक्षांना पूर्णविराम देत जैन यांच्या नेतृत्वाखालील सेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेऊन त्यावर शिक्कामोर्तबही करून घेतले. मात्र, यामुळे भाजपच्या स्वबळाच्या घोषणेवर पाणी फिरले. महाजन यांची खेळी फत्ते झाली, त्यातून त्यांनी पक्षातील खडसे गटाला शह दिल्याचे सांगितले गेले. दुसरीकडे श्रेष्ठींच्या भेटीनंतरही युती निश्‍चित झाली, असे सांगण्याचे धाडस जैन किंवा महाजन यांपैकी एकानेही केले नाही. जागा वाटपानंतर युती होईल, असे जाहीर करून टांगती तलवार कायम ठेवली. मात्र, शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखांनी दुसऱ्या दिवशी जळगावात येऊन पक्षाच्या चिन्हावर लढण्याचे गुपित फोडले. 

"मातोश्री'चा खलिता, अन्‌... 
मुंबईत युती होते न होते तोच जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगावात आले. त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट शिवाजीनगरातील जैन यांच्या निवासस्थानी जाऊन "युती करा, परंतु शिवसेनेच्या चिन्हावरच लढा', असा "मातोश्री'वरचा "खलिता' दिला. अर्थात तो मान्य करण्याशिवाय जैन गटाला पर्यायही नव्हता. त्यांनी चिन्हावर लढण्याचा निर्णय मान्य केला. मात्र, यात जैन गटाचीच पंचाईत झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रश्‍न सत्तेतील अधिकारांचा... 
शिवसेनेच्या चिन्हावर लढल्यास जैन यांच्या महापालिकेतील नेतृत्व संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. "खानदेश विकास आघाडी' असताना महापालिकेतील सत्तेत सर्व निर्णय अगदी वर्षाचा महापौर करण्याचे अधिकारही जैन यांच्याकडेच होते. मात्र, जर शिवसेनेच्या चिन्हावर लढले तर हे सर्व अधिकार शिवसेनेच्या नेत्यांकडे जातील. सत्ता आली तरी महापौर आणि उपमहापौर कोण असावा, ते नावही "मातोश्री'वरूनच निश्‍चित होईल. अगदी जळगावातील नगरसेवकांच्या बैठकांचे आदेशही मुंबईतूनच येतील. यामुळे "खाविआ' आणि त्याच माध्यमातून जैन यांच्या नेतृत्वाची ताकदही संपुष्टात येणार आहे. या स्थितीत दोन्हीकडून जैन यांच्या नेतृत्वालाच शह बसणार असल्याने "युती'चे बूमरॅंग झाल्याचे सध्या जैन गटाला वाटत आहे. 

जागा वाटपाची आडकाठी..? 
खेळीतील सर्व पत्ते हातातून गेल्यानंतर "डाव विस्कटणे' हे आता शिल्लक राहिले आहे. जागा वाटपाची टांगती तलवार या ठिकाणी कामात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच आडकाठीने संघर्ष उभा करून युतीचा "साप' खलास करण्याची खेळी होण्याची शक्‍यता आहे. यातून शिवसेना स्वतंत्र तर लढेलच, परंतु "खाविआ'ही स्वतंत्रपणे उभी करून भाजपवर मात करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही नंतर सांगता येणार आहे. त्यामुळे आता युतीच्या जागा वाटपाकडेच अधिक लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com