निवडणुकीच्या हंगामात खडसे जेव्हा वनभाज्यांवर बोलतात... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

भुसावळ : सध्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र राजकारणाची चर्चा सुरू आहे. मात्र, काल (22 सप्टेंबर) माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी काही महिलांशी चक्क "वनभाज्या' या विषयावर चर्चा केली. निमित्त होते चारठाणा (ता. मुक्ताईनगर) येथे आयोजित भाजी स्पर्धेचे. 

भुसावळ : सध्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र राजकारणाची चर्चा सुरू आहे. मात्र, काल (22 सप्टेंबर) माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी काही महिलांशी चक्क "वनभाज्या' या विषयावर चर्चा केली. निमित्त होते चारठाणा (ता. मुक्ताईनगर) येथे आयोजित भाजी स्पर्धेचे. 
चारठाणा हे गाव पट्टेदार वाघ परिसरात दिसल्याने विशेष चर्चेत आले होते. त्याचबरोबर एक सुंदर पर्यटन केंद्र म्हणूनही हा भाग विकसित होत आहे. अशा या निसर्गरम्य ठिकाणी आदिवासी महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामविकास समिती चारठाणा यांच्यातर्फे वनभाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी शहरातूनही महिला व पुरुष आले होते. यात राष्ट्रसेविका समितीच्या सदस्या होत्या. स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळा पार पडल्यानंतर पाहुण्यांसाठी भवानीदेवी मंदिर परिसरात असलेल्या सुंदरबागेत भोजन व्यवस्था केलेली होती. आमदार खडसे यांनीही सगळ्यांसमवेत वनभोजनाचा आनंद घेतला. मात्र, त्यांनी आपला स्वतःच्या जेवणाचा डबा घरून आणला होता. जेवणानंतर तेथील अर्ध्या कापलेल्या पाच-सहा लिंबाच्या फोडी मीठ टाकून खाल्ल्या. हे दृश्‍य पाहून "नाथाभाऊ, तुमचे दात थांबत नाही का', असा प्रश्‍न एकाने विचारल्यावर त्यांनी लिंबू खाणे आरोग्यास कसे फायदेशीर आहे, हे उदाहरणासह पटवून दिले. माझे दातही त्यामुळेच अद्याप मजबूत आहेत. एकही दात पडला नाही, असे त्यांनी सांगितले. लिंबू खाण्याची पद्धत चुकली तर त्रास होतो, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यानंतर राष्ट्रसेविका समितीच्या सदस्यांशी एकाने परिचय करून दिल्यावर त्या महिला म्हणाल्या, की आम्ही शहरातून येथे या भाज्या घेण्यासाठी पिशव्या घेऊन आलो. मात्र, येथे त्या भाज्या मिळाल्या नाहीत. त्यावर खडसे यांनी वनभाज्यांची माहिती तर दिलीच; परंतु या भाज्या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सापडत नाहीत, त्या विविध ठिकाणी शोधाव्या लागतात, शिवाय बाजारातील भाज्यांप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवता येत नाही, त्या लगेच कराव्या लागतात, असे सांगितले. वनभाज्यांसंदर्भातील खडसेंचे ज्ञान पाहून शहरी महिला अवाक्‌ झाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election khadse vagitable