पडद्यामागील सूत्रधार : लढ्ढा कुटुंबीयांच्या प्रचाराचे नियोजनबद्ध व्यवस्थापन 

manish zawar
manish zawar

राजकारणात यशस्वी होण्यासाठी नियोजन आवश्‍यक असते. निवडणूक लढविणाऱ्याला किंवा निवडून आल्यानंतरही राजकीय नेत्याला ते शक्‍य नसते. त्यासाठी साथ हवी असते. तीच साथ देण्याचे कार्य राजूभाई दोशी आणि मनीष झवरसह दहा मित्रांचा ग्रुप करत असतो. माजी महापौर नितीन लढ्ढा व त्यांच्या पत्नी अलका यांच्या प्रचाराचे नियोजनबद्ध व्यवस्थापन हेच मित्र करतात. 
 
व्य वसाय क्षेत्रातील नितीन लढ्ढा यांना राजकीय क्षेत्राचा कोणताही गंध नव्हता आणि राजकारणात जाण्याची त्यांची इच्छाही नव्हती. परंतु माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सन 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी सन 1996 मध्ये त्यांच्या पत्नी अलका यांनी पालिका निवडणूक लढविली. राजकारणाचा गंध नसल्याने निवडणुकीत काय करायचे, याची माहिती लढ्ढांना नव्हती. मात्र, त्यांचे मित्र दोशी व झवर यांनी त्यांना त्यासाठी बळ दिले. त्यांनी निवडणुकीत अर्ज दाखल करण्यापासून प्रचाराची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अलका विजयी झाल्या. त्यानंतर मात्र लढ्ढा परिवाराने राजकीय क्षेत्रात मागे वळून पाहिलेच नाही. नितीन लढ्ढा यांना महापौरपदही मिळाले. मात्र, या यशाचे श्रेय लढ्ढा कुटुंबीय आजही या मित्रांनाच देतात. 
राजूभाई दोशी गेल्या वीस वर्षांपासून लढ्ढा कुटुंबीयांचे प्रचाराचे नियोजन करतात. ते एम. कॉम. आहेत. त्यांचा बिल्डिंग कामाचा व्यवसाय आहे. ते गुजराती समाजाचे अध्यक्ष आहेत. बॉम्बे लॉजमागे लढ्ढांच्या शेजारी राहत असल्याने लहानपणापासून ते नितीन लढ्ढांचे मित्र आहेत. 
मनीष झवर हे जळगावातील भारत दुग्धालयाचे संचालक आहेत. माजी नगरसेवक (कै.) बबन बाहेती यांचे ते कार्यकर्ते आहेत. शिवाय माहेश्‍वरी समाजाचेही ते कार्य करतात. समाजकार्य करताना नितीन लढ्ढांशी त्यांचा संपर्क आला आणि गेल्या वीस वर्षांपासून मनीषही मित्रत्वाचे नाते जोपासून लढ्ढांच्या प्रचाराचे सूत्र राबवत आहेत. 
दोशी आणि झवर यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांचे मित्रही त्यांना या कार्यात मदत करतात. निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून मतदानाच्या दिवशी प्रभागातील प्रत्येक घरी जाऊन मतदारांना मतदानासाठी जाण्याचा आग्रह ते करतात. याशिवाय आता संगणकीय प्रचाराचे नियोजनही ते करतात. प्रचारासाठी ते स्वतंत्र "वॉर रूम' तयार करतात. नितीन लढ्ढा आताच्या निवडणुकीत प्रभाग क्र. 5 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराचे सर्व नियोजन दोशी आणि झंवर करीत आहेत. विशेष म्हणजे या मित्रांनी कधीही निवडणूक लढविलेली नाही. तसेच कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही. मनीष झवर यांना प्रभाग समिती सदस्यपद मिळाले एवढेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com