माजी उपमहापौरांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला 

माजी उपमहापौरांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला 

तिरंगी व बहुरंगी लढती होत असलेल्या प्रभाग क्र. 15 कडे शहराचे लक्ष लागून आहे, ते माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्या उमेदवारीने. पत्नीसह ते या प्रभागातून उमेदवारी करीत आहेत. त्यांचे जवळचे मित्र ललित कोल्हे यांच्या भाजपप्रवेशानंतर खरेतर महाजनांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, त्यांनी सुरेशदादा जैन यांची साथ सोडली नाही. आघाडीनंतरही प्रभागातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार समोरासमोर आहेत. भाजप नेते एकनाथ खडसेंचे समर्थक अशोक लाडवंजारी हेही उमेदवार असल्याने या प्रभागातील लढती चांगल्याच रंगणार आहेत. 
-- 
माजी उपमहापौरांचा प्रभाग असल्याने याकडे सर्वांचेच विशेष लक्ष आहे. मेहरुण गावासह गावठाण परिसर, तांबापुरा, फुकटपुरा, संत गुलाबाबा कॉलनी असा हा परिसर. मेहरुण व तांबापुऱ्यातील परिसराचा समावेश असल्याने संवेदनशील प्रभाग म्हणून त्याची ओळख. या प्रभागातील मतदान केंद्रांनाही संवेदनशील असा विशेष दर्जा. अनेक वर्षांपासून या ठिकाणी ढेकळे, नाईक, महाजन परिवारांचे वर्चस्व राहिले आहे. ललित कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे सर्वाधिक निकटवर्तीय म्हणून सुनील महाजनही त्याच मार्गाने जातील, असे मानले जात होते. प्रत्यक्षात त्यांनी सुरेशदादा जैनांच्याच तंबूत राहणे पसंत केले. 

महाजनांची उमेदवारी प्रतिष्ठेची 
स्वतः सुनील महाजन या प्रभागातील "अ' गटातून रिंगणात असून, भाजपने त्यांच्यासमोर मेहमूद मोहम्मद बागवान हे मुस्लिम समाजातील उमेदवार दिले आहेत. तसा हा प्रभाग मुस्लिमबहुल मानला जातो. कॉंग्रेसनेही जाकीर बागवान यांना उभे केल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महाजन यांना मिळू शकतो, असे मानले जाते. 

महाजनांची पत्नीही रिंगणात 
प्रभाग क्र. 15 "ब'मधून सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री शिवसेनेच्या उमेदवार असून, त्यांच्यासमोर भाजपच्या रिझवाना खाटीक व समाजवादी पक्षाच्या खुर्शिदाबी पटेल उमेदवार आहेत. या तिरंगी लढतीतही दोन मुस्लिम व एक हिंदू उमेदवार रिंगणात असल्याने मुस्लिम मतांचे विभाजन निर्णायक ठरू शकते. "क' जागेसाठी ढेकळे कुटुंबातील अनुसया नामदेव ढेकळे भाजपच्या उमेदवार असून त्यांना शिवसेनेच्या शबानाबी शेख यांचे आव्हान आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नसरीन खान, समाजवादी पक्षाच्या जाहीदाबी शेख व मेघा सोनवणे या "अपक्ष' उमेदवारही रिंगणात आहेत. या जागेसाठीही तीन मुस्लिम व दोन हिंदू उमेदवार रिंगणात आहेत. 

खडसेंचे समर्थक मैदानात 
प्रभाग क्र. 15 "ड'मधून एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक, भाजपचे माजी महानगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी मैदानात असून त्यांना शिवसेनेचे प्रशांत नाईक यांचे आव्हान असेल. कॉंग्रेसचे दीपक बाविस्कर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आसिफ शेख व नीलेश पाटील "अपक्ष' उमेदवार आहेत. आघाडीनंतरही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रभागात आमने-सामने असून या बहुरंगी लढतीत लाडवंजारींसह प्रशांत नाईक यांची कसोटी लागेल. 
-- 
संवेदनशील प्रभाग आणि तणाव 
प्रभागात झोपडपट्टीबहुल भाग आहे. मोलमजुरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. सामाजिकदृष्ट्या संमिश्र वस्ती आहे. संवेदनशील प्रभाग म्हणून त्याची ओळख असल्याने मतदानाच्या दिवशी या परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त होते. शिवाय, मतदान केंद्रांवरही मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती असते. त्यामुळे प्रभागातील लढतींबद्दल राजकीय वर्तुळात नेहमीच उत्सुकता लागून असते. 
त्यातच मुस्लिम समाजाचे मतदान प्रभागात बऱ्यापैकी आहे. त्यामुळे काही पक्षांनी मुस्लिम उमेदवारांवर भर दिला आहे. भाजप, शिवसेनेचेही उमेदवार मुस्लिम आहेत. त्यामुळे येथील मुस्लिम मतदार हिंदू विचारांच्या भाजप-सेनेला जवळ करतात की, आघाडी अथवा अपक्षांच्या बाजूने आपला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com