तुल्यबळ उमेदवारांमुळे लढती रंगतदार ठरणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

प्रभाग क्र. 12 मधील काही भाग तुटून तो 13 मध्ये समाविष्ट झाल्याने या प्रभागातील समीकरणे काही प्रमाणात बदलल्याचे चित्र आहे. माजी महापौरांनी या प्रभागातून माघार घेतल्यानंतरही चारही जागांवर दिग्गज रिंगणात असल्याने प्रत्येक जागेसाठी तुल्यबळ उमेदवारांमुळे प्रभागातील चारही लढती रंगतदार ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रभागातून उमेदवारीवरून भाजपमध्ये पसरलेल्या नाराजीतून कुणाचे भाग्य उजळणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 

प्रभाग क्र. 12 मधील काही भाग तुटून तो 13 मध्ये समाविष्ट झाल्याने या प्रभागातील समीकरणे काही प्रमाणात बदलल्याचे चित्र आहे. माजी महापौरांनी या प्रभागातून माघार घेतल्यानंतरही चारही जागांवर दिग्गज रिंगणात असल्याने प्रत्येक जागेसाठी तुल्यबळ उमेदवारांमुळे प्रभागातील चारही लढती रंगतदार ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रभागातून उमेदवारीवरून भाजपमध्ये पसरलेल्या नाराजीतून कुणाचे भाग्य उजळणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 
माजी महापौर, स्थायी समितीच्या माजी सभापतींचा प्रभाग म्हणून प्रभाग क्र. 13 ओळखला जातो. पूर्वाश्रमीच्या प्रभागातील काही भाग यातून तुटला. तर प्रभाग क्र. 12 मधील काही भाग समाविष्ट झाला. त्र्यंबकनगर, हतनूर कॉलनी, आदर्शनगर, संभाजीनगर, मोहननगर, दौलतनगर, समतानगरचा काही भाग, विवेकानंदनगर, देवेंद्रनगर, रायसोनीनगर असा परिसर या प्रभागात येतो. समतानगरचा भाग सोडला तर संपूर्ण परिसर नोकरदार वर्ग असलेला संमिश्र लोकवस्तीचा. माजी महापौर किशोर पाटील यांचा प्रभाव असलेला हा भाग. त्यांनी या निवडणुकीतूनच माघार घेतली आहे. ते स्वत: किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यही रिंगणात नाही. हा प्रभागाला धक्काच होता. मात्र, त्यातून काही नवीन समीकरणे पुढे आली आहेत. 

तिरंगी, चौरंगी लढती 
प्रभाग क्र. 13 "अ'मध्ये माजी नगरसेविका वंदना किशोर भोसले या शिवसेना, तर सुरेखा नितीन तायडे भाजपच्या उमेदवार आहेत. किशोर भोसलेही काही वर्षे नगरसेवक होते. त्यामुळे त्यांचा अनुभव पत्नीसाठी कामी येऊ शकतो. तर नितीन तायडे हे साई परिवारातील सदस्य असून त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने पत्नी सुरेखा यांना त्याचा लाभ मिळू शकेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमिला सपकाळे व "अपक्ष' नलिनी भारूळे यादेखील उमेदवार आहेत. याच प्रभागातील "ब'मध्ये स्थायी समितीच्या माजी सभापती व भाजप उमेदवार ज्योती बाळासाहेब चव्हाण व शिवसेनेच्या दीपिका पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. 

खुल्या प्रभागात महिलांचा प्रभाव 
प्रभाग क्र. 13 मधील "क'मधून विद्यमान नगरसेविका अश्‍विनी देशमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार असून, त्यांच्यासमोर भाजपचे जितेंद्र मराठे व शिवसेनेचे नितीन सपके रिंगणात आहेत. ही लढत तुल्यबळ मानली जात असली तरी अश्‍विनी देशमुख यांची प्रभागातील प्रतिमा त्यांना लाभदायक ठरू शकते. त्यांचे पती विनोद देशमुख यांच्या अनुपस्थितीत त्या सक्षमपणे प्रभागात फिरून केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. तर भाजपचे मंडळाध्यक्ष असलेले जितेंद्र मराठे प्रथमच महापालिका निवडणूक लढवत आहेत. नितीन सपके यांचे निर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले काम त्यांची जमेची बाजू असेल. त्यामुळे ही लढत रंगतदार ठरणार आहे. 

जि. प. सभापतींच्या पत्नी रिंगणात 
या प्रभागातील "ड'मधून स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बरडे यांच्या पत्नी संगीता बरडे यांच्यासह भाजप उमेदवार व जिल्हा परिषदेतील सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या पत्नी अंजनाबाई, "अपक्ष' उमेदवार सत्यजित पाटील व संजय निकुंभ रिंगणात आहेत. नितीन बरडेंच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना संगीता बरडे परिचित आहेत. अंजनाबाई या ठिकाणी नवख्या असल्या, तरी भाजपच्या उमेदवारीचा त्यांना लाभ मिळू शकतो. हा प्रभाग खुला असला तरी त्यातून महिलांचा प्रभाव जाणवतो. प्रभागातील संमिश्र वस्ती कुणाला कौल देते, यावर निकाल अवलंबून असेल. मात्र, प्रभागातून दोनपेक्षा जास्त महिला सभागृहात जातील, असे दिसते. 
 

Web Title: marathi news jalgaon election prabhag ladhati