राजकीय उलाढालीचे नवे केंद्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षीय कार्यालयापेक्षा यावेळी चर्चेसाठी नव्या जागा मुख्य केंद्र ठरत आहेत. त्याच ठिकाणी नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. 

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षीय कार्यालयापेक्षा यावेळी चर्चेसाठी नव्या जागा मुख्य केंद्र ठरत आहेत. त्याच ठिकाणी नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. 

निवडणुका आल्या म्हणजे पक्षांचे कार्यालय गजबजल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळते. परंतु सद्यःस्थितीत पक्ष कार्यालयात शांतता आहे. त्याऐवजी प्रत्येक पक्षाने चर्चेसाठी नवी ठिकाणी निवडली आहेत. भारतीय जनता पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता नसताना पक्ष कार्यालय हेच एकमेव चर्चेचे ठिकाण होते. सद्यःस्थितीत भाजप कार्यालयात फारशी गर्दी दिसत नाही. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या राजकारणाची दिशा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयातून होत आहे. शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या या संपर्क कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. या ठिकाणी वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी असते. याच ठिकाणी पक्षाच्या निर्णयाची चर्चा होत आहे. आता उमेदवारी निश्‍चित होण्यासाठी वेग आल्याने इच्छुक उमेदवारांची याच ठिकाणी गर्दी होत आहे; तर भाजपचे पदाधिकारी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवानी यांच्याही याच ठिकाणी बैठका होत आहेत. श्री. महाजन असल्यावर या ठिकाणी एखाद्या जत्रेप्रमाणे कार्यकर्त्याची आणि रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी असते. त्यामुळे सध्या हे जनसंपर्क कार्यालय भाजपच्या मुख्य उलाढालीचे केंद्र ठरले आहे. याशिवाय ओंकारेश्‍वर मंदिराजवळील आमदार चंदुलाल पटेल यांच्या निवासस्थानीही पक्षाच्या बैठका होत आहेत. इतर पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त चर्चेचेही हे सध्या केंद्र आहे. 

जैनांचे कार्यालय सेनेचे केंद्र 
सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडी किंवा शिवसेना यांच्या निवडणुकांचे राजकीय उलाढालीचे केंद्र नेहमीच जैन यांचे शिवाजीनगरचे निवासस्थान राहिले आहे. मात्र, यावेळी खानदेश मिल संकुलातील रमेश जैन यांचे कार्यालय हे त्यांचे मुख्य केंद्र बनले आहे. याच ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, याच ठिकाणी पक्षाच्या बैठकाही होत आहेत. अगदीच मोठा निर्णय असेल, तर शिवाजीनगरातील निवासस्थानी पदाधिकारी चर्चेसाठी जात आहेत. परंतु, सर्व निर्णय सध्या जैन यांच्या याच कार्यालयातून होत आहे. गोलाणी संकुलातील शिवसेनेच्या कार्यालयात निवडणुकीची फारशी रेलचेल दिसून येत नाही. या ठिकाणी कार्यकर्ता अभावानेच दिसून येतो. 

"राष्ट्रवादी'ची चर्चा मजूर फेडरेशनला 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही आकाशवाणी चौकात कार्यालय आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या बैठका होत आहेत. चर्चाही झाल्या, मात्र याच कार्यालयाच्या शेजारी असलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या मजूर फेडरेशनच्या कार्यालयात महापालिका निवडणुकीच्या चर्चा तसेच निर्णय होत आहेत. त्यामुळे "राष्ट्रवादी'च्या कार्यालयासोबत मजूर फेडरेशन हे सुद्धा राजकीय उलाढालीचे केंद्र आहे. कॉंग्रेस मात्र याला अपवाद राहिली आहे. त्यांचे अद्याप नवे कोणतेही ठिकाण नाही. पक्षाच्या बैठका तसेच निर्णय कॉंग्रेस भवनमध्येच होत आहेत.

Web Title: marathi news jalgaon election rajkaran new center