Vidhan sabha : आघाडी होऊनही संयुक्त मेळाव्यासाठी मुहूर्ताचा शोध? 

कैलास शिंदे
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला असून, 21 ऑक्‍टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनीही तयारी केली आहे. सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेना युतीबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीची "आघाडी' जाहीर झाली आहे. त्यांचे जागावाटपही निश्‍चित झाले आहे. मात्र, स्थानिक स्तरावर अद्याप दोन्ही पक्षांतर्फे संयुक्त मेळावा घेण्यात आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातही हीच स्थिती असून, एकूण 11 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात "आघाडी'चा संयुक्त मेळावा झालेला नाही. त्यामुळे आघाडी होऊनही संयुक्त मेळाव्यासाठी मुहूर्ताचा शोध सुरू आहे की काय?

निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला असून, 21 ऑक्‍टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनीही तयारी केली आहे. सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेना युतीबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीची "आघाडी' जाहीर झाली आहे. त्यांचे जागावाटपही निश्‍चित झाले आहे. मात्र, स्थानिक स्तरावर अद्याप दोन्ही पक्षांतर्फे संयुक्त मेळावा घेण्यात आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातही हीच स्थिती असून, एकूण 11 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात "आघाडी'चा संयुक्त मेळावा झालेला नाही. त्यामुळे आघाडी होऊनही संयुक्त मेळाव्यासाठी मुहूर्ताचा शोध सुरू आहे की काय? असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे. 

जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत नऊ जागांवर राष्ट्रवादी व जळगाव आणि रावेर या जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार लढण्याचे निश्‍चित झाले असल्याचे सांगण्यात येते. त्यादृष्टीने दोन्हीही पक्षांकडून तयारी सुरू आहे. परंतु दोन्ही पक्ष संयुक्तपणे तयारी करीत असल्याचे कोठेही चित्र दिसून आलेले नाही. राष्ट्रवादीचे बहुतांश मतदारसंघांत उमेदवारही निश्‍चित आहेत; तर एका मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवारही निश्‍चित आहे. परंतु कोणत्याही ठिकाणी आघाडीचा मेळावा झालेला नाही. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर झालेली आघाडी अद्याप स्थानिक स्तरावर पोहोचलेली दिसत नसल्याचे चित्र आहे. 
भाजप-शिवसेना युतीशी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची लढत आहे. मात्र, सद्यःस्थितीत युतीसंदर्भात घोषणा झालेली नाही. अशा स्थितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने संयुक्त मेळावा घेऊन त्याचा फायदा उठविणे गरजेचे होते. मात्र, दोन्ही पक्षांतील जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाची त्याबाबत कोणतीही तयारी दिसत नाही. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोडाच; परंतु दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही अद्याप झालेली नाही. जिल्ह्यात सद्यःस्थितीत दोन्ही पक्ष कमकुवत आहेत. त्यांना भक्कम असलेल्या भाजप-शिवसेना युतीशी लढत द्यायची आहे. अशा स्थितीत त्यांनी संयुक्त लढण्याची तयारी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे युती झालेली नसल्याने त्यांना थेट जनतेत जाण्यासाठी मोठा वेळ मिळणार आहे. मात्र, दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते अद्याप गाफील आहेत. त्यांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे. जर ते वेळीच जागे झाले आणि मतदारसंघांत संयुक्तिक मेळावे सुरू केले, तर त्यांना मोठे यशही मिळू शकेल. परंतु आघाडीच्या संयुक्त मेळाव्याबाबत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी कोणता मुहूर्त शोधतात? असा प्रश्‍न आता कार्यकर्त्यांनाही पडला आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तयारी जोरात सुरू आहे. त्यात मतदारसंघांत संयुक्त मेळावा घेण्याचीही आमची तयारी आहे. लवकरच आम्ही जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत संयुक्तपणे मेळावे घेऊन एकदिलाने निवडणूक लढून मोठे यश मिळवू. 
- ऍड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस, जळगाव 
 
पक्षातर्फे उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झालेली नाही, ती जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. उमेदवारांची वैयक्तिक पातळीवर तयारी सुरू आहे. मात्र, तरीही आता मतदारसंघांत तयारीच्या दृष्टीने बोलणी करून लवकरच आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संयुक्त मेळावे घेऊ. 
- ऍड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election rashtrwadi congress aaghadi medava