खडसेंचा गड सांभाळण्याचे रोहिणी यांच्यासमोर आव्हान 

खडसेंचा गड सांभाळण्याचे रोहिणी यांच्यासमोर आव्हान 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात पक्ष वाढविला. आपला मतदारसंघ बांधला. आज त्यांच्या मतदारसंघाचा हा किल्ला त्यांच्या कन्या सांभाळत आहेत. त्याच रांगेत आता ऍड. रोहिणी खडसे या सुद्धा आहेत. फरक एवढाच आहे, पक्षानेच एकनाथराव खडसेंना बाजूला केले आहे. महाजन आणि मुंडे कन्यांचा लढा विरोधकांशी होता. या ठिकाणी पक्षांतर्गत व विरोधकांशी लढा देऊन यश मिळवून वडिलांचा गड सांभाळण्याचे आव्हान ऍड. रोहिणी खडसे यांच्यासमोर आहे. 

मुक्ताईनगर अन एकनाथराव खडसे हे जणू समीकरणच बनले आहे. तब्बल 35 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्या अगोदर कॉंग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ घेण्यासाठी त्यांना चांगलीच मशागत करावी लागली. आज जरी भाजपला या मतदारसंघात सुगीचे दिवस असले तरी त्यामागे खडसेंचे मोठे कष्ट आहेत, हे कुणीच नाकारणार नाही. "पक्ष हेच माझे कुटुंब, पक्ष हाच माझा आत्मा' हे तत्त्व घेऊन एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात भारतीय जनता पक्ष बांधणीसाठी कार्य केले. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या यामुळे सहकाराचे भक्कम जाळे, त्या माध्यमातून पक्षाची बांधणी, अशी कॉंग्रेसची मजबूत तटबंदी जिल्ह्यात होती. त्याशिवाय (कै.) मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील, (कै.) के. एम. बापू पाटील, (कै.) डी. डी. चव्हाण, (कै.) प्रल्हादराव पाटील अशी दिग्गज मंडळी कॉंग्रेसमध्ये होती. या नेत्यांसमोर भाजप पक्षाची उभारणी कठीण काम होते. मात्र, खडसे यांनी मुक्ताईनगरात ही तटबंदी भेदून यश मिळविले आणि त्याच आधारावर पुढे जिल्ह्यातही आणि राज्यातही कमळ फुलविले. सन 1987 मध्ये ते कोथळीचे सरपंच झाले. त्यानंतर 1990 मध्ये पूर्वीचे "एदलाबाद' आताचे "मुक्ताईनगर' मतदारसंघातून ते प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते सलग सहा टर्म या मतदारसंघातून निवडून आले आहेत. सन 1995 मध्ये युती शासनाच्या काळात ते जलसंपदामंत्री, अर्थमंत्री, होते. सन 2008 पासून ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते तर 2014 मध्ये युती शासनाच्या काळात ते तब्बल दहा खात्याचे मंत्री होते. 
पक्षाने यावेळी त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा आहेत. आता ऍड. रोहिणी यांना मुक्ताईनगरातील हा गड सांभाळायचा आहे. एकनाथराव खडसे भाजपसाठी संघर्ष करीत असताना त्यांच्यासमवेत राज्यात (कै.) प्रमोद महाजन (कै.) गोपीनाथ मुंडे यांचे समर्थ नेतृत्व होते. आज याच नेत्यांच्या कन्या त्यांच्या मतदारसंघात समर्थपणे कार्य करीत आहेत. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आज वारसा सांभाळत आहेत. तर मुंबईत प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन वडिलांप्रमाणेच पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे ऍड. रोहिणी खडसे यांच्यावर ही जबाबदारी आली आहे. 
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे दिवंगत झाल्याने पंकजा आणि पूनम यांना जनतेची सहानुभूती मिळाली तर पक्षही खंबीरपणे मागे उभा राहिला. ऍड. रोहिणी खडसे यांची परिस्थिती थोडी वेगळी आहे. एकनाथराव खडसे समर्थपणे कार्य करीत असताना पक्षनेतृत्वानेच त्यांना बाजूला करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याऐवजी रोहिणी यांना उमेदवारी मिळाली. यात जनतेची मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे, परंतु पक्षांतर्गत काही प्रमाणात खदखद निश्‍चित आहे. तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे आव्हान आहेच. ते आव्हान खडसे उमेदवार असतानाही होतेच. परंतु ते उमेदवार असताना त्यांच्या नावामुळे मतदारांमध्ये वेगळा उत्साह असायचा. त्यामुळे मित्रपक्षाचे आव्हानही जाणवयाचे नाही. ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत विश्‍वास टिकवीत मित्रपक्षांचे आव्हान मोडीत काढून विरोधकांसमोर यश मिळवायचे आहे. त्यामुळे त्यांना हा संघर्ष कठीण आहे. एकनाथराव खडसे सोबतीला आहेत, त्यामुळे फार मोठी जमेची बाजू आहे, त्याशिवाय रक्षा खडसे खासदार आहेत. त्यांनीही मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. हे त्यांना फायदेशीर ठरणारच आहे. 

आक्रमकतेची धार हवी... 
वैयक्तिकरीत्या मतदारसंघाचा विकास करण्यासह वडिलांचा राजकीय वारसा आपण समर्थपणे सांभाळू शकणार आहोत, असा विश्‍वास ऍड. रोहिणी खडसे यांना लोकांमध्ये निर्माण करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना पंकजा मुंडे व पूनम महाजन यांच्या पावलावर पाऊल टाकून आक्रमक व्हावे लागणार आहे. तरच त्यांना यश मिळणार, हे निश्‍चित आहे. त्यामुळे ऍड. रोहिणी खडसे यांची ही खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. त्यात त्या यशस्वी झाल्यास भाजप नेत्यांच्या वारसा सांभाळणारी आणखी एक कन्या समर्थपणे पुढे आली हेच दिसून येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com