प्रचार फेऱ्यांपूर्वीच सोशल मीडियावर प्रचाराची धूम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी वेगवेगळ्या पक्षांकडे उमेदवारीचा दावा केला आहे. पक्षांकडून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी काही इच्छुकांनी आपली उमेदवारी पक्की असल्याचे मानून सोशल मीडियावर प्रचारही सुरू केला. पण आता वॉर्डातून प्रचारफेऱ्या निघण्यास काही दिवस बाकी असण्यापूर्वीच उमेदवारांची दावेदारी मतदारांपर्यंत सोशल मीडियामार्फत पोहचू लागली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका असो. या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा अगदी पुरेपूर उपयोग उमेदवारांकडून घेतला जातो. सोशल मीडियावरील प्रचारासाठी निवडणूक आयोगाचे देखील बंधन नाही. यामुळे उमेदवार प्रचारासाठी अगदी पूर्ण वापर करून मतदारांपर्यंत पोहचू लागले आहेत. यातच आता महापालिकेची निवडणूक असल्याने येथील राजकारणाचे चित्र मांडणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात असल्याचे दिसत होते. हे चित्र बदलून आता उमेदवारांकडूनच सोशल मीडियाद्वारे प्रचाराला सुरवात झाली आहे. 
 
आकर्षित करण्याचा प्रयत्न 
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अद्याप फुटलेला नाही. तरी वॉर्डातून उभ्या असलेल्या उमेदवारांचा प्रचार सोशल मीडियावर होऊ लागला आहे. सोशल मीडियावरून मजकूर आणि स्वतःची छबी तयार करून मतदारांना आकर्षित केले जात आहे. यात प्रामुख्याने भाजपच्या उमेदवारांची आघाडी आहे. या खालोखाल शिवसेनेच्या उमेदवारांकडून सोशल मीडियावरून प्रचार सुरू झाला आहे. इतकेच नाही, तर अपक्ष उमेदवार देखील मागे राहिलेले नाही. "हाक तुमची साथ आमची', "प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गरज आपल्या आशीर्वादाची', "तुमचा एक तास सहकुटुंब मतदानासाठी आमची पाच वर्षे आपल्या सेवेसाठी' यासारख्या लाइन व फोटो शेअर करून उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते देखील सोशल मीडियाच्या प्रचारात जोडले आहेत. 

Web Title: marathi news jalgaon election social midea