लक्षवेधी लढत- ऍड. शुचिता हाडा विरुद्ध भारती जाधव बाजी कुणाची? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकींतर्गत प्रभाग क्र. 6 "क'मधील उमेदवार व शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती अजय जाधव विरुद्ध भाजपच्या विद्यमान नगरसेविका ऍड. शुचिता हाडा हे दोन्ही जुनेच उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. जाधव पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत, हाडा पुन्हा यश मिळविण्यासाठी सज्ज आहेत; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरला चौधरीही तिसऱ्या उमेदवार आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. शाहूनगर, जेडीसीसी बॅंक, इंडिया गॅरेज व तुकारामवाडी, गणेशवाडी आदी परिसर या प्रभागात मोडला जातो. 

माजी नगरसेविका भारती जाधव व विद्यमान नगरसेविका ऍड. शुचिता हाडा या दोन्ही उमेदवार अत्यंत तुल्यबळ असून, तिसऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सरला चौधरी त्यांच्या स्पर्धेत आहेत. शिवसेनेच्या उमेदवार भारती जाधव या माजी नगरसेवक अजय जाधव यांच्या पत्नी आहेत. महापालिकेत खानदेश विकास आघाडीचे नगरसेवक म्हणून त्यांनी कार्य केले. महिला- बालकल्याण समिती सभापती व स्थायी समितीचे सभापतिपदही त्यांनी भूषविले आहे. या पदांच्या माध्यमातून त्यांनी सभागृहात आपल्या कामाची छाप पाडली आहे. या प्रभागातून त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत; तर त्यांचे पती अजय जाधव एक वेळा निवडून आले आहेत. यावेळी भारती जाधव शिवसेनेतर्फे उभ्या आहेत. गेल्या वीस वर्षांपासून प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांचा प्रभागात जनसंपर्क चांगला आहे. सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक असल्याने जैन हे प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. मात्र, गेल्या वेळी झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्या सज्ज आहेत. 
ऍड. शुचिता हाडा या शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले अतुलसिंह हाडा यांच्या पत्नी आहेत. हाडा यांनी गेल्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या वेळी त्या भाजपतर्फे याच प्रभागातून विजयी झाल्या. प्रथमच महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून गेल्यानंतरही त्यांनी आपल्या कामाची चांगली छाप पाडली. सभागृहात त्यांनी विविध प्रश्‍नांना वाचा फोडली तसेच प्रभागातील प्रश्‍नही त्यांनी सोडविले. सरला चौधरी यांचेही तुकारामवाडी तसेच परिसरातील इतर भागांत सामाजिक कार्य आहे. 
या प्रभागात एकूण वीस हजार मतदान लेवा पाटील समाजाचे आहे. त्यासोबत इतर संमिश्र वस्तीचा हा परिसर आहे. या मतदारसंघात सामाजिक स्तरावर फारसे मतदान होत नाही. मात्र, जनसंपर्क आणि कामाच्या बळावरच मतदान होईल. विद्यमान नगरसेविका ऍड. हाडा आणि माजी नगरसेविका भारती जाधव यांच्यात होणारी लढत हीच खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरणार आहे. मात्र, सरला चौधरी याही काही किमया करणार का? याकडेही लक्ष असणार आहे.

Web Title: marathi news jalgaon election suchita hada bharti jadhav