एका वर्षात विकास हा तर "चुनावी जुमला' : सुरेशदादा जैन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

जळगाव : आपण जळगाव शहरात तीस वर्षे केवळ विकासाचे काम केले आहे. वाघूर पाणी योजना, व्यापारी संकुले, दवाखाने, शाळा हा आपल्या विकास कामाचा आरसा आहे. त्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे एका वर्षात विकासाची गोष्ट करणे म्हणजे "चुनावी जुमलाच' आहे. त्यांनी काय हमी द्यावी यावर आपण टीका करणार नाही. जनतेसमोर आपण विकासनामा दिला आहे. त्यानुसार आपण पुढे नियोजनबद्ध काम करून मूलभूत सुविधांसह चांगला विकास जनतेला देणार आहोत. तीस वर्षे माझ्यावर विश्‍वास ठेवला या पुढेही जनता तो ठेवेलच यांची आपल्याला खात्री आहे असे मत माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

जळगाव : आपण जळगाव शहरात तीस वर्षे केवळ विकासाचे काम केले आहे. वाघूर पाणी योजना, व्यापारी संकुले, दवाखाने, शाळा हा आपल्या विकास कामाचा आरसा आहे. त्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे एका वर्षात विकासाची गोष्ट करणे म्हणजे "चुनावी जुमलाच' आहे. त्यांनी काय हमी द्यावी यावर आपण टीका करणार नाही. जनतेसमोर आपण विकासनामा दिला आहे. त्यानुसार आपण पुढे नियोजनबद्ध काम करून मूलभूत सुविधांसह चांगला विकास जनतेला देणार आहोत. तीस वर्षे माझ्यावर विश्‍वास ठेवला या पुढेही जनता तो ठेवेलच यांची आपल्याला खात्री आहे असे मत माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

सन 1985 पासून शहर विकास आघाडी, खानदेश विकास आघाडी या माध्यमातून माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्ता आहे. त्यांनी जळगाव शहरासाठी वाघूर प्रकल्प, तब्बल 25 व्यापारी संकुले, शाळा, दवाखाने इमारती उभारल्या आहेत. याशिवाय चांगले रस्तेही उभारले असून शहराची "विकासात्मक' रचना केल्याचा त्यांचा दावा आहे. यावेळी शिवसेनेतर्फे त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीत मैदानात आहेत. त्यांनी 70 प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. तर पाच प्रभागात पुरस्कृत उमेदवार दिले आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या यशासाठी ते स्वतः प्रत्येक प्रभागात "डोअर टू डोअर' प्रचार करीत आहेत. आपल्याला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचाही त्यांचा दावा आहे. 

प्रश्‍न : तीस वर्षात आपण शहर भकास केल्याचा आरोप आहे? 
उत्तर
: हे आपल्याला मान्यच नाही. आम्ही विकास काय केला आहे. त्याचा आरसा जनतेसमोर आहे. वाघूर पाणी योजना आपण पूर्ण केली, त्यामुळे आज जळगावकरांची टंचाईतून मुक्तता झाली. व्यापारी संकुले उभी केली. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय उभे राहिले त्यातून युवकांना रोजगार मिळाला आहे. शिक्षणासाठी शाळेच्या इमारती उभ्या केल्या. शहरातील सर्व भागात महापालिकेच्या माध्यमातून दवाखाने उभारून त्याठिकाणी उपचाराच्या सुविधा निर्माण केल्या. गटारी बांधल्या, रस्तेही केले. 

प्रश्‍न : "भाजप'च्या काळात विकास ठप्प झाला का? 
उत्तर
: होय, पालिकेत आमची सत्ता असताना सर्व सुरळीत सुरू होते. परंतु, सन 2001 मध्ये भाजप नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी कर्जाची हप्ते फेड थांबविली, घरकुलांचे मक्तेदारांचे पैसे देणे बंद केले, त्यामुळे सुरू असलेल्या कामांना खीळ बसून विकासाचा गाडा थांबला. 

प्रश्‍न : विरोधकांनी विकास कामांना आडकाठी आणली काय? 
उत्तर
: होय. आम्ही जळगाव शहराचा नियोजनबद्ध विकास करीत होतो. परंतु महापालिका झाल्यानंतर विरोधकांनी त्या कामांना आडकाठी आणली. आम्ही केलेल्या ठरावांना त्यांनी आयुक्तांच्या माध्यमातून विखंडीत करायला पाठवून ते विखंडीत केले. त्यामुळे विकासाची कामे थांबली तसेच राजकीय हेवेदावेही त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. 

प्रश्‍न : गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबित का? 
उत्तर
: आम्ही गाळ्यांच्या संदर्भात अनेक ठराव केले प्रशासनाने ते ठराव शासनाकडून विखंडीत केले. त्यानंतर न्यायालयाने निर्देश दिले त्यानुसार प्रशासनाने अंमलबजावणी केली पाहिजे. गाळ्यांच्या संदर्भात शासनाने अधिनियमात बदल केला आहे, त्याआधारे व्यापाऱ्यांना कसा दिलासा देता येईल हे त्यांनी सांगावे. 

प्रश्‍न : तुम्ही युतीचा प्रस्ताव दिला होता? 
उत्तर
: होय. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो, त्यावेळी मुख्यमंत्री यांनी विकासासाठी निधी देण्याची हमी दिली. त्यामुळे शहराचा विकास होत असल्याने आम्ही दोन्ही पक्षाच्या माध्यमातून जनतेला विकास देण्याकरिता आम्ही युतीचा प्रस्ताव दिला होता. 

प्रश्‍न : मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे मान्य केले होते? 
उत्तर
: मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी आम्हाला दोनशे कोटी देण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी सांगितले म्हणून निधी मिळाला असे होत नाही. कल्याण- डोंबिवली महापालिकेला त्यांनी सहा हजार कोटी देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, सहा रुपयेही दिले नाही. असे उद्धव ठाकरे यांनीही आपल्याला सांगितले आहे. 

प्रश्‍न : नगरसेवक मक्ता घेतात त्यामुळे कामे खराब होतात? 
उत्तर
: नगरसेवक मक्ता घेत नाहीत. मात्र, निविदा प्रक्रिया प्रशासन करीत असते, ते त्याला मंजुरी देत असते. त्यामुळे त्यांच्या नियमात ज्या निविदा असतील त्यांना कामे मिळते, त्यामुळे मक्तेदारांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही प्रशासनाची असते. त्यामुळे काम निकृष्ट झाल्यास त्यांनीच कारवाई करावी. त्याला कोणाचीच आडकाठी राहत नाही. 

प्रश्‍न : विकासाच्या हमीचे काय? 
उत्तर
: सरकारने आम्हाला दोनशे कोटी देण्याचे मान्य केले तर आम्हीही विकास करून दाखवू शकतो परंतु निधी देण्याबाबत सरकारचे काही निकष ठरलेले आहेत. त्यात पलीकडे जाऊन निधी दिला जाऊ शकत नाही त्यामुळे कुणी विकासाची हमी देत असेल तर त्यावर विश्‍वास कसा ठेवणार? 

प्रश्‍न : भविष्यातील विकासाबाबत नियोजन काय? 
उत्तर : आम्ही शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. सहा वर्षापूर्वी शहर विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर केला होता. परंतु पुढे त्यात काही प्रगती झाली नाही. नंतर आमच्याच पाठपुराव्याने अमृत योजनेचे काम आता मार्गी लागत आहे. हे काम होत नाही तोवर रस्ते होऊ शकत नाही. त्यासाठी दोन वर्षे द्यावीच लागतील सोबतच लोकसहभागातूनही विकासकामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. 

Web Title: marathi news jalgaon election sureshdada jain interveiw