Loksabha 2019 : शेवटच्या दिवसापर्यंत "वेट ऍण्ड वॉच' : खासदार ए. टी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

जळगाव : माझ्यावर पक्षाने अन्याय केला असून, उमेदवारीची मागणी आजही कायम आहे. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार आहोत, असे खासदार ए. टी. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

जळगाव : माझ्यावर पक्षाने अन्याय केला असून, उमेदवारीची मागणी आजही कायम आहे. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार आहोत, असे खासदार ए. टी. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी पक्षाच्या विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे विद्यमान खासदार ए. टी. पाटील पक्षावर नाराज आहेत. त्यांनी आपले समर्थक, कार्यकर्त्यांचा मेळावाही पारोळा येथे घेतला होता. त्यावेळी त्यांनी पक्षाने बदल करून आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. 
भाजपने उमेदवारी दिली नाही, तर खासदार पाटील बंड करून आपली उमेदवारी दाखल करतील, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. मेळाव्यानंतर खासदार पाटील गेले चार दिवस कोणाच्याच संपर्कात नव्हते, आज ते पारोळ्यात होते. 
"सकाळ'ने त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की मेळाव्यानंतर आपण पारोळ्यातच निवासस्थानी होतो, कुठेही गेलो नव्हतो. मात्र, या काळात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. त्यांना आपली व्यथा सांगितली व उमेदवारी आपल्यालाच द्यावी, अशी मागणीही केली आहे. त्यांनी आपल्याला थांबण्याचे सांगितले आहे, त्यामुळे आपण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (ता. 4) प्रतीक्षा करणार आहोत. त्यानंतर आपण निर्णय घेणार आहोत. त्यामुळे सध्या आपण शांत आहोत. 
----

Web Title: marathi news jalgaon election a t patil wait and watch