पत्नीच्या उमेदवारीने आमदारांची प्रतिष्ठा पणाला : प्रभाग क्रमांक 7 मधील चित्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

जळगाव : विद्यमान नगरसेवकांमुळे भाजपच वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक 7मधून आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या पत्नी स्वतः: उमेदवार आहेत. स्वाभाविकच सीमा भोळेंच्या उमेदवारीने आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय याच प्रभागातील अन्य जागांवर अन्य दिग्गजांच्या उमेदवारीमुळे या प्रभागाकडे राजकीय वर्तुळाचे "विशेष' लक्ष लागून आहे. सुशिक्षित नागरिकांचा हा परिसर आपले वजन नेमका कुणाच्या पारड्यात टाकतो, हे पाहावे लागेल. 
 

जळगाव : विद्यमान नगरसेवकांमुळे भाजपच वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक 7मधून आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या पत्नी स्वतः: उमेदवार आहेत. स्वाभाविकच सीमा भोळेंच्या उमेदवारीने आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय याच प्रभागातील अन्य जागांवर अन्य दिग्गजांच्या उमेदवारीमुळे या प्रभागाकडे राजकीय वर्तुळाचे "विशेष' लक्ष लागून आहे. सुशिक्षित नागरिकांचा हा परिसर आपले वजन नेमका कुणाच्या पारड्यात टाकतो, हे पाहावे लागेल. 
 
प्रभाग क्रमांक सात. उच्चभ्रू, उच्चशिक्षित लोकवस्तीचा हा संपूर्ण प्रभाग असून लेवा, मराठा समाजाच्या प्राबल्यासह अन्य संमिश्र वस्ती याठिकाणी आहे. चंद्रप्रभा कॉलनी, गणेश कॉलनी, शिवकॉलनी, प्रोफेसर कॉलनी, ब्रुक बॉण्ड कॉलनी, विष्णूनगर हा उच्चभ्रू परिसर तर आरएमएस कॉलनी, श्‍यामराव नगर, आशाबाबा नगर हा काहीसा मागास भागही या प्रभागात आता समाविष्ट झाला आहे. 
गेल्यावेळी या प्रभागात भाजपचे वर्चस्व होते. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने या प्रभागाकडे साऱ्या जळगावचे लक्ष लागून राहण्याचे कारण एवढेच की, त्यातून आमदार सुरेश भोळेंच्या पत्नी व विद्यमान नगरसेविका सीमा उमेदवार आहेत. "अ'मधून त्यांचा सामना शिवसेनेच्या साधना प्रदीप श्रीश्रीमाळ यांच्याशी होत आहे. या दोघा उमेदवारांमध्ये थेट लढत होत असल्याने कुणाचे वर्चस्व राहते, हे समजून येईल. आमदार भोळे यांचा हा प्रभाग असून ते विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या प्रभागातून राजीनामा दिला होता व त्यांच्या पत्नी बिनविरोध निवडून आल्या. आता पुन्हा त्या नशीब आजमावत असून महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने महापौरपदाचा मार्ग या प्रभागातून जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

डॉ. सोनवणेंच्या कामगिरीकडे लक्ष 
याच प्रभागातील "ब'मधून शिवसेनेच्या अंकिता पाटील यांची भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे यांच्याशी लढत होईल. राष्ट्रवादीच्या सविता बोरसे यादेखील उमेदवार असल्याने या तिरंगी लढतीकडेही लक्ष लागून असेल. प्रभाग 7 "क'मध्ये भाजपचे नगरसेवक डॉ. अश्‍विन सोनवणे यांच्यासमोर शिवसेनेचे रत्नाकर झांबरे, कॉंग्रेसचे माजी महानगराध्यक्ष उल्हास साबळे यांचे पुत्र स्वप्नील साबळे व अपक्ष संदीप जगताप अशी चौरंगी लढत आहे. डॉ. अश्‍विन हे चौथ्यांदा या प्रभागातून उमेदवार असून ते सलग चौथ्यांदा पालिका सभागृहात जातात का, याबद्दल उत्सुकता आहे. साबळेंच्या कुटुंबातील दुसरी पिढी या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरत आहे. 

भाजपचे नाराज, सेनेचे पुरस्कृत 
प्रभाग 7 "ड'मध्ये अंतिम टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने डावलल्याने अपक्ष अर्ज भरणाऱ्या नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश सीताराम पाटील यांच्यावर माघारीसाठी दबाव होता, त्यांनी जुमानला नाही. या जागेसाठी भाजपचे सचिन भीमराव पाटील यांच्यासह अपक्ष कल्पना चव्हाण व प्रवीण पाटील हेदेखील उमेदवार आहेत. तरीही खरी लढत जयश्री, योगेश व सचिन या तिघा पाटलांमध्येच होईल, असे दिसते. या जागेवर सेनेचे अधिकृत व पुरस्कृत केलेल्या दोघांपैकी कोणत्या उमेदवाराची कामगिरी सरस ठरते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. एकूणच हा प्रभाग सध्या कमालीचा चर्चेचा बनला असून भाजपसह शिवसेना, कॉंग्रेस आघाडी व अपक्षांनीही या प्रभागासाठी कंबर कसली आहे. 

Web Title: marathi news jalgaon election wife candidate prabhag 7