भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी युतीचा प्रस्ताव : एकनाथ खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

जळगाव ः खानदेश विकास आघाडी, शिवसेनेने शहराच्या विकासासाठी नव्हे; तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. सुदैवाने ही युती झाली नाही ते बरेच झाले, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कोपरा सभेत केले. 

जळगाव ः खानदेश विकास आघाडी, शिवसेनेने शहराच्या विकासासाठी नव्हे; तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. सुदैवाने ही युती झाली नाही ते बरेच झाले, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कोपरा सभेत केले. 
महापालिका निवडणूक प्रचारांतर्गत आज दुपारी प्रभाग क्र. 17 मध्ये व रात्री प्रभाग क्र. 16 मधील भाजपच्या उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या कोपरा सभांमध्ये ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे, वामन खडके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री. खडसे म्हणाले, की शहराचा विकास कोणामुळे खुंटला, हे सर्वज्ञात आहे. घरकुल बांधण्यासाठी घेतलेले कर्ज त्यांच्याच बिल्डरांना ठेके दिले अन्‌ बुडविले. कर्ज घेऊनही घरकुल पूर्ण बांधले नाहीत. ते तसेच अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या कर्जाचा डोंगर वाढत जाऊन जळगावकरांच्या डोक्‍यावर ते ठेवले. शहरात चांगले रस्ते नाहीत, स्वच्छता नाही, दिवाबत्ती नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. जळगाव महापालिकेतही भाजपला एक हाती सत्ता द्या, पाच वर्षांच्या आत शहराचे चित्र आम्ही बदलू. 

परिवर्तनासाठी पावले उचला! 
सभेत हुडको, घरकुल आदी योजनांमध्ये झालेल्या भष्ट्राचाराबाबत खडसे म्हणाले, की भ्रष्टाचार करणाऱ्यांनी केला. त्यामुळे जळगावच्या प्रत्येक नागरिकावर कर्जाचा डोंगर त्यांनी चढविला. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळेनाशा झाल्या. पर्यायाने शहरात विकासकामे ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांनी परिवर्तनासाठी पावले उचलून भाजपला बहुमताने निवडून द्यावे. 

कर्जाचा बोजा कमी करू 
महापालिकेवर साडेचारशे कोटींच्या हुडकोचा कर्जाचा बोजा कमी झाल्याशिवाय शहराची परिस्थिती सुधारणार नाही. महापालिकेत सत्ता मिळाल्यास हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारची आम्ही मदत घेऊ, असेही खडसे म्हणाले. 

Web Title: marathi news jalgaon election yuti khadse