उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षनेते गाळताहेत घाम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणूककाळात नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. आता महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढून घाम गाळत आहेत. 

जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणूककाळात नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. आता महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढून घाम गाळत आहेत. 
जळगाव महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात सुस्त असलेली निवडणूक अंतिम टप्प्यात मात्र वेगात आहे. प्रचारात नेत्यांनीही मुलाखतीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले, तर उमेदवारही आता आपली ताकद लावत आहेत. याशिवाय नेते आता आपले मोठेपण विसरून थेट मतदारांच्या प्रभागात जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. त्यामुळे निवडणुकीचा ज्वर आता वाढला आहे. 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झटत आहेत. त्यांच्यासमवेत खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, प्रदेश संघटनमंत्री ऍड. किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करीत आहेत. 
शिवसेनेतर्फे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, माजी आमदार आर. ओ. पाटील उमेदवारांच्या प्रचारार्थ रणांगणात उतरले आहेत. माजी मंत्री जैन तर मागील काही वर्षांच्या झंझावाताप्रमाणेच पायी प्रचार करीत आहेत. ते प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष- आमदार डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गफ्फार मलिकही पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभागात जनतेच्या भेटी घेत आहेत. तसेच कोपरा सभाही घेत आहेत. कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरींसह पदाधिकारी पक्षाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करीत आहेत. 

नेत्यांच्या आवाजात मोबाईलवरून प्रचार 
मोबाईल फोनव्दारे प्रचार करण्याचे डिजिटल तंत्र आता उमेदवारही वापरू लागले आहेत. नेत्यांच्या आवाजात मतदानाचे आवाहन करणारे मेसेज आता प्रभागातील नागरिकांना मोबाईलवर येऊ लागले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon electopn candidate prachar