उंबरखेडचा अभियंता पाजतोय केरळवासीयांना शुद्ध पाणी 

live photo
live photo

उंबरखेड (ता. चाळीसगाव) ः केरळमध्ये पुराचे पाणी कमी होत असले तरी येथील नद्या, विहिरींमध्ये गढूळ पाणी असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे,अशा परिस्थितीत येथील रहिवासी व भावनगर (गुजरात) येथील "सेंट्रल सॉल्ट आणि मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट' (सीएसएमसीआरआय) मध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ तथा अभियंता डॉ. संजय पाटील यांच्या पथकातर्फे केरळमधील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. 
केरळमध्ये पुराच्या पाण्यामुळे इमारतीच्या इमारती उद्‌ध्वस्त झाल्या. ज्यामुळे सर्वत्र चिखल साचला असून मदतकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी इतर विविध सुविधा पुरविल्या जात असल्या तरी सद्यःस्थितीत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी गढूळ पाणी झाल्याने ते पिण्यायोग्य नव्हते. त्यामुळे पुरग्रस्तांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारची वैज्ञानिक संशोधन कार्यशाळा म्हणून लौकीकप्राप्त असलेल्या "सीएसएमसीआरआय'ने 40 फुट लांब बसमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा थेट केरळला घेऊन जाण्याचे निश्‍चित केले. चालकासह सात जणांच्या पथकाने केरळमधील पथ्थनम जिल्ह्यातील चेंगनरु आलप्पी तालुका गाठला. कारण याच भागात पुराची तीव्रता अधिक होती. येथील परुमला पांडनार गावात पाणी शुद्धीकरणीची बस घेऊन गेल्यानंतर ग्रामस्थांना मिळणारे पिण्याचे पाणी गढूळ येत होते. जे शरीराला घातक ठरणारे होते. उंबरखेडच्या डॉ. संजय पाटील यांनी भाषेची अडचण येत असतानाही ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. 

बसची वैशिष्ट्ये 
शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या बसवर सौर ऊर्जा पॉवरची यंत्रणा बसविलेली आहे. बस सुरु झाल्यानंतर डिझेलमधून सौर पॅनेलला उर्जा देखील प्राप्त होते. ज्यामुळे एका तासाला सुमारे तीन हजार लिटर पाणी शुद्ध करता येऊन ते वितरीत करता येते. हा उपक्रम केंद्र शासनाचा असून वैज्ञानिक संशोधन कार्यशाळेत तयार केलेले तंत्रज्ञान जेव्हा देशाला गरज असते, तेव्हा वापरले जाते. ज्यामुळे या तंत्रज्ञानाची उपयोगिता सर्वसामान्यांपर्यंत पोचते. बससोबत असलेल्या चार टेक्‍निशियनच्या माध्यमातून केरळमधील विशेषतः ज्या भागात गढूळ व पिण्याच्या दृष्टीने अयोग्य असलेले पाणी मिळत आहे, अशा ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सध्या परुमला पांडनार पंचायत या गावात डॉ. पाटील हे पथकासह थांबून आहेत. आज त्यांना पंधरा दिवस झाले असून जोपर्यंत नैसर्गिकदृष्ट्या ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्याची सोय होत नाही, तोपर्यंत त्यांचे पथक गावातच थांबणार आहे. परुमला पांडनार पंचायतीसह जवळच्या काही खेड्यांमधील रहिवाशांनाही ते शुद्ध पाण्याचा पुरवठा करीत आहेत. 
 
असे आहे तंत्रज्ञान: 
-बसवर सौरउर्जा पॉवर यंत्रणा 
-तासाला तीन हजार लिटर पाणी शुध्द 
-चार तंत्रज्ञ कार्यरत 

 
नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही प्राधान्याने शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जातो. महाराष्ट्रात लातूरला देखील जुन्या विहिरीतील पाणी शुद्ध करुन पुरवठा केला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञान जेव्हा समाजातील तळागाळातील माणसापर्यंत गरजेच्यावेळी पोचते, तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान लाभते. 
- डॉ. संजय पाटील, शास्त्रज्ञ ः "सीएसएमसीआरआय', भावनगर (गुजराथ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com