"लॉकडाउन'मध्ये भरतोय "शानभाग'चा ऑनलाइन वर्ग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

शानभाग विद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजिटल अध्यापनाचा अभिनव उपक्रम राबविला आहे. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत आहेत. 

जळगाव  : "कोरोना'च्या संसर्गामुळे देशभरात "लॉकडाउन' जाहीर झाल्याने अनेक शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानभाग विद्यालयाने या विद्यार्थ्यांचे समूह करून त्यांचे डिजिटल वर्ग सुरू केले आहेत. दिवसातून एकदा मोबाईलवर "व्हीसी'द्वारे मुलांना एकत्रित करत त्यांना दिवसभरातील उपक्रम दिले जातात. दुसऱ्या दिवशी त्या उपक्रमांचा आढावा घेऊन पुढच्या सूचना दिल्या जातात.. हा अभिनव उपक्रम सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. 

संचारबंदीचा पहिला परिणाम शाळा, महाविद्यालये व खासगी शिकवणी वर्गांवर झाला. ही सर्व अध्यापनाची ठिकाणे 18 मार्चपासूनच बंद आहेत. मात्र, शिक्षणसंस्था बंद असल्या तरी काही महाविद्यालयांनी वरिष्ठ वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन लेक्‍चर सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर जळगावातील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ब. गो. शानभाग विद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजिटल अध्यापनाचा अभिनव उपक्रम राबविला आहे. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत आहेत. 

असा आहे उपक्रम 
शानभाग विद्यालयातील शिक्षकांनी वेगवेगळ्या वर्गांचे त्या वर्गाच्याच नावाने व्हॉटस्‌ऍप ग्रुप केले. एका ग्रुपमध्ये 14-15 विद्यार्थ्यांसह (पालकांचे मोबाईल क्रमांक) त्यांचे वर्गशिक्षक, विविध विषयांचे शिक्षक सहभागी करून घेतले. या ग्रुपवर विद्यार्थ्यांसाठी रोज अध्यापन व त्यावर आधारित करावयाच्या होमवर्क (ऍक्‍टिव्हिटी) बाबत सूचना दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी त्यासाठी पालकांच्या मोबाईलवर "झूम ऍप' डाऊनलोड केली आहे. दिवसातून एकदा व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरील मेसेजनुसार ठराविक वेळी या "झूम ऍप'द्वारे शिक्षक, विद्यार्थ्यांची व्हीसी (video conference) होते. त्यात त्या दिवसाच्या उपक्रमांवर चर्चा होऊन संबंधित विषयांचे शिक्षक त्या विषयातील ठराविक टॉपिकबद्दल स्वअध्ययन करण्यासंबंधी सूचना करतात. दुसऱ्या दिवशी त्या अध्ययनाचा आढावा घेतला जातो. 

आणखी बरेच काही 
केवळ अभ्यासच नव्हे तर सुटीच्या काळात विद्यार्थ्यांनी पालकांना घरकामात मदत करावी, सकाळी व्यायाम करावा, यासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय, चित्रकला, संगीत, कार्यानुभवाचे उपक्रमही विद्यार्थ्यांना सांगितले जात असून, सुटीच्या काळातही त्यांना या उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. मुख्याध्यापिका अंजली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे त्यांचा अभ्यास, सुटीच्या दिवसांमध्ये त्यांना चांगल्या सवयी लावणे, विविध उपक्रमांमध्ये बिझी ठेवणे हा हेतू असून, विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- राजेंद्र पाटील, विभाग प्रमुख 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Entering the "Lockdown" section of ShaanBhag online