वर्षभरात तेवीस जणांना मिळाली दृष्टी 

राजेश सोनवणे
रविवार, 10 जून 2018

जळगाव ः जिल्ह्यात एकमेव असलेल्या मांगीलाल बाफना नेत्रपेढीतून नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी व्यापक प्रयत्न होत आहेत. याला आता विविध संस्थांचेही एकप्रकारचे सहकार्य मिळत असून, नेत्रदानाच्या या चळवळीचे फलित म्हणून वर्षभरात 39 जणांनी नेत्रदान केले. तर 23 जणांना दृष्टी देण्याचे काम झाले. मात्र, "मरावे परी नेत्ररूपी उरावे' हा संदेश समाजात रुजत असला, तरी नेत्रदानाची चळवळ अधिक दृढ होणे गरजेचे आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात एकमेव असलेल्या मांगीलाल बाफना नेत्रपेढीतून नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी व्यापक प्रयत्न होत आहेत. याला आता विविध संस्थांचेही एकप्रकारचे सहकार्य मिळत असून, नेत्रदानाच्या या चळवळीचे फलित म्हणून वर्षभरात 39 जणांनी नेत्रदान केले. तर 23 जणांना दृष्टी देण्याचे काम झाले. मात्र, "मरावे परी नेत्ररूपी उरावे' हा संदेश समाजात रुजत असला, तरी नेत्रदानाची चळवळ अधिक दृढ होणे गरजेचे आहे. 
नैसर्गिक मृत्यू होणाऱ्यांचे डोळे नेत्रदानातून मिळतात. मात्र, नातेवाइकांना नेत्रदानासाठी तयार करणे अवघड असते. नेत्रदानाबाबतची जागृती वाढविण्यासाठी नेत्रपेढीतर्फे जिल्हा व तालुकास्तरावर नेत्रदूतांची निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात मांगीलाल बाफना नेत्रपेढी ही नेत्रदान स्वीकारणारी आणि मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणारी एकमेव पेढी आहे. 1999 पासून बाफना नेत्रपेढीचे कार्य सुरू झाले. नेत्रपेढीकडे आजपर्यंत 433 दात्यांनी नेत्रदान केले. त्यांच्या नेत्रदानामुळे पेढीतर्फे शस्त्रक्रियेद्वारे 213 दृष्टिहीनांना सृष्टी पाहता आली. 19 वर्षांपूर्वी नेत्ररोपण करणाऱ्या 70 ते 80 जणांची नावे प्रतीक्षा यादीत होते. ते प्रमाण आज कमी होऊन केवळ दहा जण प्रतीक्षा यादीत आहेत. 

नेत्रपेढीत प्रिझर्व्ह व्यवस्था 
नेत्ररोपणासाठी अंध व्यक्तीच्या बुबुळाच्या मागील पडदा व्यवस्थित असणे आवश्‍यक असते. जिल्हा रुग्णालयात नेत्ररोपणाची व्यवस्था उपलब्ध नसली तरी शहरातील मांगीलाल नेत्रपेढीमार्फत नेत्र संकलित करून सुरक्षितरीत्या नेत्रपेढीत ठेवले जातात. नेत्र काढून ते प्रिझर्व्ह करण्याची सुविधा नेत्रपेढीत उपलब्ध असल्याने ते सुरक्षित ठेवून गरज असणाऱ्या अंधांवर यादीनुसार मोफत नेत्ररोपण केले जाते. 

चळवळ व्हावी व्यापक 
नेत्रदान करण्याबाबतची चळवळ गेल्या दोन-तीन वर्षांत चांगली वाढली आहे. या चळवळीत अनेकांनी नेत्रदानाचा संकल्पही केला आहे. परंतु मरणोत्तर नेत्रदानाबाबत समाजात काही गैरसमजुती आहेत. मृत्यूनंतर डोळे काढून घेतल्यानंतर पुढच्या पिढीला अंधत्व येते, पुढचा जन्म अंधाचाच मिळतो किंवा पुढच्या जन्मी चेहरा विद्रूप होतो, यासारख्या अंधश्रद्धा आजही आहेत. यामुळेच संकल्पपत्र भरून दिल्यानंतरही परिवारातील सदस्यांकडून त्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. म्हणूनच नेत्रदानाची चळवळ आणखी व्यापक होणे गरजेचे आहे. 

नेत्रपेढीच्या प्रारंभापासून सुरू झालेली नेत्रदानाची चळवळ आज मोठी झाली असून, अनेकजण स्वतःहून नेत्रदानासाठी संपर्क साधतात. यामुळेच प्रतीक्षा यादीतील नेत्ररोपण करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 
- भानुदास येवलेकर, व्यवस्थापक, मांगीलाल बाफना नेत्रपेढी 
 

Web Title: marathi news jalgaon eye donetion