मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासह मोठ्या घोषणेची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीवेळी ते शहर दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता 28 किंवा 29 जुलैला ते जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असून, शहरासाठी दोनशे कोटींचा निधी जाहीर करतात, की "जळगाव दत्तक' घेण्याचे आश्‍वासन देऊन जातात, याबद्दल उत्सुकता आहे. 

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीवेळी ते शहर दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता 28 किंवा 29 जुलैला ते जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असून, शहरासाठी दोनशे कोटींचा निधी जाहीर करतात, की "जळगाव दत्तक' घेण्याचे आश्‍वासन देऊन जातात, याबद्दल उत्सुकता आहे. 
जळगाव महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजपने गांभीर्याने घेतली आहे. नाशिक महापालिकेतील विजयाचा फॉर्म्युला जळगावातही अमलात आणण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा प्रयत्न असून, त्यासाठी त्यांनी सुरवातीपासूनच नियोजनात आघाडी घेतली आहे. सुरेशदादा जैन गटातील महापौरांसह खानदेश विकास आघाडी, राष्ट्रवादीतील नगरसेवकांना गळाला लावण्यात महाजन यांनी बाजी मारली. आता राज्य व केंद्रातील सत्तेचा जळगावात कसा उपयोग करून घेता येईल, त्याचे प्लॅनिंग सुरू आहे. काही केल्या जळगाव महापालिका ताब्यात घ्यायची, असा महाजनांचा प्रयत्न असून ललित कोल्हे व नगरसेवकांच्या भाजपप्रवेशाने त्यांच्या या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. 

मुख्यमंत्र्यांची सभा 
त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना जळगावात आणण्याचे भाजपचे नियोजन आहे. अर्थात, त्या आधी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्याही सभा होतील. मुख्यमंत्र्यांची सभा 28 किंवा 29 जुलैला होईल, असे सांगितले जात आहे. 

मोठ्या घोषणेची शक्‍यता 
गिरीश महाजन या निवडणुकीच्या निमित्ताने जळगावच्या विकासासाठी दोनशे कोटींचा निधी आणण्याचे आश्‍वासन देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या निधीची घोषणा होऊ शकते अथवा नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी शहर दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर जळगाव शहर दत्तक घेण्याचीही घोषणा मुख्यमंत्री करू शकतात. महाजन त्यासाठी स्वत: खूप आग्रही असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, प्रतिस्पर्धी म्हणून भाजपच्या विरोधक मात्र मुख्यमंत्र्यांच्या या संभाव्य घोषणा केवळ "चुनावी जुमले' अशी टीका करण्यास मागे राहणार नाहीत, हेदेखील नक्की. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. 

दोन्ही वेळा दौरा रद्द 
दरम्यान, या आधी मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा दोन वेळा रद्द केला आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन-अडीच वर्षांत मुख्यमंत्री केवळ दोनदा जिल्ह्यात आले. एकदा जामनेरला आणि दुसऱ्यांदा चोपड्यात अरुणभाई गुजराथींच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला. त्यानंतर दोन वेळा त्यांचा दौरा निश्‍चित होऊनही तो रद्द करावा लागला. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रचारसभेच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon fadnvis 200 carore