जिल्ह्यातील 95 हजार शेतकऱ्यांना 577 कोटींची कर्जमाफी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

नैसर्गिक संकटामुळे आर्थिक कोंडीमध्ये अडकलेल्या बळीराजाला दिसाला मिळावा. यासाठी राज्य शासनाकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली.

जळगाव : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. दरम्यान महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 94 हजार 995 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 577 कोटी रुपये वर्ग केले. उर्वरीत शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
नैसर्गिक संकटामुळे आर्थिक कोंडीमध्ये अडकलेल्या बळीराजाला दिसाला मिळावा. यासाठी राज्य शासनाकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली. या योजनेची घोषणा झाल्यानंतर महिनाभर प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती मागवून सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ केला. या योजनेत नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमुक्ती योजनेत सामावून घेण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे. 

एक लाख 71 हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड 
जिल्ह्यामधील एक लाख 71 हजार 23 शेतकऱ्यांची माहिती कर्जमुक्तीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच एक लाख 43 हजार 832 कर्जखाती विशिष्ट क्रमांकासह असून त्यापैकी एक लाख 32 हजार 608 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून, 11 हजार 222 खात्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. 

कर्जमाफीसंदर्भात सहा हजार तक्रारी प्राप्त 
कर्जमाफीसाठी जिल्हास्तरी व तालुकास्तरीय समितीकडे सुमारे सहा हजार 169 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी तहसीलस्तरावर दोन हजार 54 तक्रारींचे निवारण केले असून, जिल्हास्तरावर मात्र केवळ 247 तक्रारींचे निवारण झाले असून, अद्याप दोन हजार 747 तक्रारी प्रलंबित आहेत. 

जिल्हा बॅंक वगळता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा 
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा बॅंक वगळता जिल्ह्यातील 17 हजार 950 शेतकऱ्यांच्या खात्यावर 158 कोटी 81 लाख रुपयांची रक्‍कम तर जिल्हा बॅंकेच्या 849 विका संस्थांमधील 77 हजार 45 कर्ज खात्यांवर 418 कोटी 69 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer loan 577 carrore Debt forgiveness