नियमित कर्ज भरणाऱ्यांना अध्यादेशाची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

राज्य शासनाने अर्थसंकल्पात नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 50 हजार प्रोत्साहनपर निधी देण्याची घोषणा केली. दोन लाखांवर शेतकऱ्यांसाठीही घोषणा केली. शासनाने त्याबाबतचा अध्यादेश लवकर काढला तर यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना लाभ होईल. 
- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती. 

जळगाव : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान, तसेच दोन लाखांवर कर्जाची रक्कम असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी, या घोषणांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अध्यादेशाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. 

राज्यात भाजप-सेना युती सरकारच्या काळातील "कर्जमाफी'पेक्षा महाविकास आघाडीच्या काळातील "कर्जमुक्‍ती'ची प्रक्रिया सहज आणि सोपी असल्याचे शेतकरी सांगतात. असे असले तरी जे शेतकरी नियमित कर्जाची रक्कम भरतात व ज्यांची कर्जाची रक्कम दोन लाखांवर गेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने अद्यापही कर्जमाफीचा निर्णय घेतला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सत्तेत येण्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफीची भाषा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस करीत होती, आता सत्तेत आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी का करीत नाहीत, असा सूरही शेतकऱ्यांमध्ये आहे. 
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीने नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तर दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंतची माफी देण्याची घोषणा केली. या घोषणेचा केव्हा अध्यादेश निघतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. अडीच लाखांवर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो. 
जे नियमित कर्ज फेडत होते व ज्यांचे कर्ज पन्नास हजारापर्यंत होते, त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल. ज्यांच्या कर्जांची रक्कम व्याज मुद्दलासह दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशांना दोन लाखापर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. त्यांना उर्वरित रक्कम भरावी लागणार असल्याने अनेक शेतकरी पूर्ण कर्जमुक्त होतील. शासन याबाबत दुसरा टप्पा लवकरच सुरू करणार आहे. 

कर्जमुक्तीची जिल्ह्याची स्थिती... 

- कर्जखाती अपलोड --1,64,986 
- कर्जमुक्ती यादीतील शेतकरी--1,43,832 
- आधार प्रमाणीकरण झालेले शेतकरी - 1,21,531 
- आधार प्रमाणीकरण बाकी असलेले-- 22,300 
- कर्जमाफीच्या तक्रारी केलेले शेतकरी-- 5,017 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer loan free second stage no order