विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी मेटाकुटीला 

live photo
live photo

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः गिरणा नदीमुळे बाराही महिने पाणी असलेल्या विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्यासह शेतातील पिके जगविणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तालुक्यात सद्यःस्थितीत अठरा गावांमध्ये सतरा टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, आजही काही गावांना पाण्याची टंचाई भासत असून प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 
चाळीसगाव तालुक्याचा गिरणा परिसर हा गिरणा नदीमुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र, पाच वर्षापासून या भागात पावसाचे प्रमाण खुपच कमी झाले आहे. ज्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत कमी होऊन रात्रंदिवस चालणाऱ्या विहिरी दोन तासांवर येऊन ठेपल्या आहेत. गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांनी ऊस, केळी, उन्हाळी कांदा तर गुरांसाठी चारा लागवड केली आहे. अजून मे महिना बाकी असताना मार्चमध्येच विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने पुढे कसे होणार? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 

पिण्याचा प्रश्न गंभीर 
चाळीसगाव तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे चिन्हे आत्तापासून दिसत आहेत. तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या २१८ विहिरी असून गिरणा काठावर ४८ विहिरी आहेत. या विहिरीची पातळी खालावल्याने बहुतांश गावांमध्ये पाणी कपातीचे वेळापत्रक ग्रामपंचायतींनी केले आहे. मेहुणबारे गावात दोन दिवसाआड येणारे पाणी सध्या काही भागात तिसऱ्या व चौथ्या दिवसावर गेल्याचे चित्र आहे. आजही चाळीसगाव तालुक्यात काही गावांमध्ये नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने नळांना तोट्या बसविण्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे. उद्या (१५ मार्च) गिरणा धरणातून आवर्तन सोडले जाणार असले तरी त्याचा फायदा केवळ नदीकाठच्याच गावांना होणार आहे. इतर गावांमध्ये मात्र गंभीर परिस्थिती उद्भवणार आहे. 

विहिरींची कामे सुरू 
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने सध्या क्रेन मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्यासह विहिरीतील खडक फोडण्याची कामे सुरू आहेत. मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. चाळीत भरून ठेवलेला कांदा भावाअभावी चाळीतच सडला. ही परिस्थिती पाहता बळीराजाला शेती नकोशी झाली आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी आतापासूनच विहिरींच्या कामाला लागले आहेत. काहींना विहिरीचे काम करुनही पाणी आले नाही. हातातील पैसा देखील खर्च झाल्याने बळीराजा हताश झाला आहे. त्यामुळे ‘माय खाऊ देईना आणि बाप भिक मागू देईना’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 
 
अठरा गांवाना टँकरने पाणीपुरवठा (कंसात फेऱ्या) 
चाळीसगाव तालुक्यात सद्यःस्थितीत १८ गावांना टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये करजगाव (३), अंधारी (४), रोहिणी (३), विसापुर तांडा (३), तमगव्हाण (५), ब्राह्मणशेवगे (२), नाईकनगर (२), हातगाव (२), चितेगाव (४), सुंदरनगर चिंचगव्हाण (२), घोडेगाव (३), खराडी (१), पिंपळगाव (३), न्हावे (२), ढोमणे (३), खेडी खुर्द (२), दस्केबर्डी (२) व पिंप्री बुद्रूक (३) या गावांचा समावेश आहे. 
 
तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेचे पंधरा प्रस्ताव मंजुरीसाठी 
जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली होते. त्यापैकी १२ प्रस्ताव मंजूर असून ते निविदा प्रक्रियेत आहेत. त्यामुळे लवकरच ही कामे देखील सुरू होतील. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने नियोजन केले आहे. 
- आर. सी. पाटील, सहाय्यक अभियंता ः पाणीपुरवठा विभाग, चाळीसगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com