जेवढी उचल तेवढीच ठेव ठेवण्याचा अजब फतवा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 एप्रिल 2018

 जेवढी उचल तेवढीच ठेव ठेवण्याचा अजब फतवा

जळगाव: पीककर्जासाठी जिल्हा सहकारी बॅंकांना राज्य बॅंकेकडून जेवढी उचल उचलायची असेल तेवढ्याच रकमेच्या ठेवी राज्य बॅंकेत ठेवाव्या लागतील, असा अजब फतवा काढल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

 जेवढी उचल तेवढीच ठेव ठेवण्याचा अजब फतवा

जळगाव: पीककर्जासाठी जिल्हा सहकारी बॅंकांना राज्य बॅंकेकडून जेवढी उचल उचलायची असेल तेवढ्याच रकमेच्या ठेवी राज्य बॅंकेत ठेवाव्या लागतील, असा अजब फतवा काढल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना दरवर्षी पीककर्ज वाटपासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडून (शिखर बॅंक) ठराविक रकमेचा पतपुरवठा केला जातो. पीककर्जासाठी उचल म्हणून हा निधी जिल्हा बॅंकांना दिला जातो, त्यामुळे आधीच्या वर्षातील पीककर्जाची वसुली कमी असली तरी जिल्हा बॅंकांना या निधीमुळे मदत होत असते. मात्र, राज्य सहकारी बॅंकेने जेवढ्या रकमेची उचल जिल्हा बॅंका पीककर्जासाठी करतील, तेवढाच निधी राज्य बॅंकेकडे मुदतठेव म्हणून ठेवावा लागेल, असा अजब फतवा काढला आहे. मुळात, जिल्हा बॅंकांची कर्जवसुली शंभर टक्के होऊ शकत नाही, त्यामुळे नव्या वर्षात पीककर्ज देण्यासाठी बॅंकांकडे पुरेसा निधी नसतो. शिवाय, पीककर्जाच्या उद्दिष्टाचा सर्वांत मोठा हिस्सा जिल्हा बॅंकाच उचलतात. अशा स्थितीत बॅंकांकडे निधी नसल्याने राज्य बॅंकेकडून, नाबार्डकडून हा निधी पीककर्जासाठी उचल या स्वरूपात उपलब्ध होत असतो. जिल्हा बॅंकांकडे ठेवी ठेवण्यासाठी निधी असता तर त्यांना उचल घेण्याची गरजच पडली नसती. असे असताना या फतव्यामुळे जिल्हा बॅंकांपुढे अडचण निर्माण झाली आहे. 
------- 
जिल्हा बॅंकेची 1300 कोटींची थकबाकी 
जळगाव जिल्हा बॅंकेने गतवर्षी दोन हजार कोटींचे पीककर्ज वाटप केले होते. मात्र, त्यापैकी आर्थिक वर्षात केवळ 700 कोटीच वसूल होऊ शकले असून उर्वरित 1300 कोटींचे कर्ज थकीत आहे. शासनाच्या पीककर्ज माफीच्या घोषणेमुळे ही कर्जवसुली होऊ शकलेली नाही. 
----- 
पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने संभ्रम 
अशातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावर्षी दुष्काळ नसल्याने त्या वर्षाचे कर्ज माफ केले जाणार नाही, असे सोमवारीच जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. जर गेल्यावर्षीचे कर्ज माफ होणार नसेल तर जिल्हा बॅंकेची 1300 कोटींची थकबाकी कशी वसूल होईल, हा प्रश्‍नच आहे. 
--------------- 

Web Title: marathi news jalgaon fatava