फिटनेस फंडा : मॉर्निंग वॉक, योगासनांसह संतुलित आहारास प्राधान्य

फिटनेस फंडा : मॉर्निंग वॉक, योगासनांसह संतुलित आहारास प्राधान्य

जळगाव : डॉ. राधेश्‍याम चौधरी. वैद्यकीय क्षेत्रातील नाव, यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ. व्यवसायातील यश ते आता राजकीय मैदानातही मिळविण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय, उत्साहाने सहभाग. त्यासाठी "फिटनेस' आवश्‍यकच. डॉक्‍टर म्हणून आणि राजकीय कामाचा व्याप असल्यानेही दररोज सकाळी चालणे, योगासने करणे यावर त्यांचा भर. संतुलित, सात्त्विक आहारही डॉक्‍टर असल्याने ओघाने आलाच. 
 
कॉं ग्रेसचे सर्वाधिक "ऍक्‍टिव्ह' पदाधिकारी म्हणून सध्या डॉ. राधेश्‍याम चौधरींचे नाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात घेतले जाते. जळगाव शहरात त्यांचे नाव सर्वांनाच सुपरिचित आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून डॉ. चौधरींना अजिबात चैन नाही. पहाटेपासून रात्रीपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची प्रॅक्‍टिस सांभाळून राजकीय कामासाठी विशेष वेळ देताना ते दिसतात. पक्षाच्या बैठका, मेळावे, नेत्यांचे दौरे आणि अलीकडे निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांचे अर्ज मागविणे, मुलाखती... त्यापाठोपाठ सुरू झालेला प्रचार, या सर्व कामात ते व्यस्त. स्वाभाविकत: रोज कामाच्या व्यापाचा तणाव येणारच. मात्र, स्वत:ला शारीरिक व मानसिकदृष्ट्या त्यांनी बऱ्यापैकी "फिट' ठेवलंय.. 

न चुकता मॉर्निंग वॉक 
डॉ. चौधरींचा दिवस सकाळी सहाला सुरू होतो. सहाला उठल्यानंतर तासभर मॉर्निंग वॉक न चुकता. नंतर निवासस्थानीच 15 ते 20 मिनिटे हलका व्यायाम, योगासने. प्राणायाम करून साधारणत: आठपर्यंत तयार व्हायचे. आठ ते साडेआठदरम्यान पोळी-कडधान्य असा नाश्‍ता. एरवी नऊपासून दुपारी बारापर्यंत रुग्णांची तपासणी व हॉस्पिटलचे कामकाज. बारापासून सायंकाळी सहापर्यंत पक्षाच्या कामाला वेळ. या दरम्यान दुपारी दोन ते तीनदरम्यान पोळी-भाकरी, हिरव्या पालेभाज्यांचे भोजन. सायंकाळी सहा ते रात्री साडेआठदरम्यान रुग्णसेवा. साडेआठ ते साडेनऊ या वेळेत हलके जेवण, फलाहार. 

वाचनावर भर 
वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असतानाच राजकीय पक्षाचे काम करायचे म्हटले की, तणाव आलाच. त्यातच कॉंग्रेसचे काम म्हणजे जिल्ह्यात मोठे आव्हानच. हा तणाव हलका करण्यासाठी जशी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे, तसे मानसिक स्वास्थ्यही असावे लागते. त्यासाठी सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी अर्धातास काही पुस्तकांचे वाचन आवर्जून केले जाते. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित अपडेटस्‌, तसेच सामाजिक व राजकीय स्वरुपाच्या वाचनावर भर. त्यामुळे डॉ. चौधरी वैद्यकीयदृष्ट्या अपडेट राहतात. "स्मार्ट वर्क'वर त्यांचा अधिक भर असतो. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी "ऍक्‍टिव्ह' असतात. हा सर्व व्याप तंदुरुस्तीमुळेच शक्‍य होतो, असे ते आवर्जून सांगतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com