फिटनेस फंडा : डॉ. सतीश पाटील यांचे "जॉगिंग' अन प्राणायाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांची धडाडीचे आणि आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही ते तंदुरुस्त आहेत. ते दररोज सकाळी जॉगिंग, प्राणायाम करीत असतात. हेच त्यांच्या दिवसभराच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांची धडाडीचे आणि आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही ते तंदुरुस्त आहेत. ते दररोज सकाळी जॉगिंग, प्राणायाम करीत असतात. हेच त्यांच्या दिवसभराच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे. 

कणखर आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व अशी डॉ. पाटील यांची ओळख आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य आमदार ते मंत्री असा त्यांचा राजकीय जीवनाचा प्रवास आहे. सहकार क्षेत्रातही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. जिल्हा बॅंकेचे ते चेअरमनही होते. आता पारोळा- एरंडोल मतदार संघाचे आमदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहेत. दोन्ही पदावर कार्य करीत असताना त्यांची दिवसभर धावपळ असते. मात्र या धावपळीतूनही ते आपल्या शारीरिक तंदुरस्तीकडे लक्ष देत असतात. दररोज सकाळी व्यायामाचा नियम ते कधीच चुकवीत नाहीत. अगदी बाहेरगावी असले तरीही. 

असा आहे दिनक्रम 
ते दररोज पहाटे पाचला उठतात. साडेपाचला ते घरापासून पायी चालत जातात. साधारण सहा किलोमीटर चालतात. घरी त्यांनी छोटीशी "जीम' तयार केली आहे. ट्रेडमिल मशिनवर "जॉगिंग' आणि सायकलिंगही ते करतात. साधारण अर्धा तास त्यांचा हा व्यायाम असतो. त्यानंतर पंधरा मिनिटे ते योगा करतात. त्यानंतर नास्ता, चहा घेऊन आपल्या दिवसाच्या कामाला ते सुरवात करतात. त्यांचा हा व्यायामाचा नियम अगदी बाहेरगावीही असतो. मुंबईत असल्याच आमदार निवासातून चौपाटीपर्यंत ते पायी जातात. 
 
आहारात "नॉनव्हेज' आवश्‍यकच 
डॉ. पाटील शाकाहार व मांसाहार असे दोन्ही आहार घेतात. ते म्हणतात, शरीराला आर्यन आवश्‍यक असल्याने आपण आठवड्यातून दोन वेळा मांसाहार करतोच. साधारणत: आठवड्यातून दोन वेळा मासे खातोच, असेही त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय शाकाहारात आपण कारले, गवार, भेंडी, कोबी या भाज्या खातो. दररोज सकाळी नास्त्याला मटकी, उसळ, इडली, डोसा, यापैकी काहीही घेतो. दुपारचे जेवण वेळेवर होत नसल्यामुळे आपण सकाळीच पोटभर नाश्‍ता करतो. त्यानंतर आपण कपभर दूध घेतो. रात्रीच्या जेवणात मात्र आठवड्यातून दोन ते तीन वेळा नॉनव्हेज असतेच. मात्र या शिवाय प्रवासात आपण बाहेरचे काही तळलेले वैगेरे खात नाही. मात्र बाहेरगावी जाताना आपण जेवणाचा डबा घेऊन जातो. त्यात आवडती पातोड्यांची भाजी हमखास घेतो. 
 
पत्नी चांगली "कुक' 
आहाराच्या बाबतीत बोलताना आमदार डॉ. पाटील म्हणाले की, पत्नी चांगली "कुक' आहे. त्या स्वयंपाक चांगलाच करतात. त्यांच्या हातची पातोड्यांची भाजी आपल्याला आवडते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही भाजी आपण हमखास खातो. आपला तो आहाराचा भाग झाला आहे. 
 
राजकीय जीवनात धावपळ असल्याने प्रत्येकाने फिटनेसाठी आपल्या तंदुरूस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. दररोज व्यायाम आवश्‍यकच आहे. मात्र आहारही संतुलित असावा. शाकाहारी आहार असावाच, परंतु आठवड्यातून दोन वेळा मासांहार विशेषत: मासे खाल्ल्यास शरीराला आर्यन मिळते. त्यामुळे तंदुरुस्ती राहते. 
आमदार डॉ. सतीश पाटील 
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: marathi news jalgaon fitness fanda satish patil