जळगाव जिल्ह्याचा ताप वाढला; रुग्णसंख्या 500 पार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

30 जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले असून, जिल्ह्यातील "कोरोना'बधितांची संख्या 522 वर पोहोचली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत शंभरी गाठल्यानंतर आता गावागावांत "कोरोना'चा संसर्ग वाढत आहे. कोविड रुग्णालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात "कोरोना'चे 30 "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील "कोरोना'बाधितांची संख्या 522 वर पोहोचली आहे. रुग्णांच्या चढत्या आलेखाने प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे. 

नक्‍की पहा - कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याचठिकाणी अंत्यसंस्कार 
 

जिल्ह्यात "कोरोना'च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, सावदा, यावल, भुसावळ, रावेर, धरणगाव, भडगाव, पारोळा, एरंडोल, अमळनेर या तालुक्‍यातील "कोरोना' संशयित असलेल्या 318 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले आहे. यातील 30 जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले असून, जिल्ह्यातील "कोरोना'बधितांची संख्या 522 वर पोहोचली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

असे वाढले रुग्ण 
जिल्ह्यात आज 30 नवे "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये भडगावात 15, अमळनेर 3, भुसावळ 3, शिरसोली 3, एरंडोल 2 तर जळगाव, यावल, जामनेर, सावदा, धरणगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यापैकी एक अहवाल पुर्नतपासणीचा आहे. तसेच आज सर्वाधिक पॉझिटिव्ह 15 रुग्ण भडगावात आढळून आले आहे. दरम्यान, शिरसोली येथे आढळलेले तीनही रुग्ण एकाच कुटुंबातील बारीनगरातील आहेत. 

एरंडोलला 72 "निगेटिव्ह' 
एरंडोल तालुक्‍यातील संशयिताचे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले. यात सर्व 72 संशयित रुग्णांचे अहवाल "निगेटिव्ह' आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र, सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एरंडोलकरांची चिंता वाढली. 

ओंकारनगरात पुन्हा "पॉझिटिव्ह' 
जळगाव शहरातील ओंकारनगरात "कोरोना'चा एक रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वी देखील या परिसरात एका प्रतिष्ठित डॉक्‍टरच्या कुटुंबीयांना "कोरोना'ची लागण झाली होती. मात्र, त्यानंतर आज पुन्हा या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon five thousand corona virus case