मुंबईतील मॅडमच्या मध्यस्थीने नियुक्तीपत्रे

मुंबईतील मॅडमच्या मध्यस्थीने नियुक्तीपत्रे

जळगाव : बळिरामपेठ, शिवाजी नगरातील उच्चशिक्षित तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांत गंडवल्या प्रकार उघडकीस आल्यावर शहर पोलिस ठाण्यात मुंबई-बदलापुरच्या महिलेसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून अटकसत्रात ठगबाजांची साखळी थेट यावल, जळगाव ते थेट मुंबई मंत्रालयापर्यंत असून संशयिताची मोठ-मोठ्या लोकांमध्ये उठबस असून मंत्रालयातही मोठे धागेदोरे असण्याची शक्‍यता आहे. 

बळिरामपेठेतील तरुण लीलाधर बोरनारे आणि शिवाजी नगरातील रहिवासी तौसिफ शेख या दोघा तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी दहा लाखांत गंडवण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहर पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणातील मध्यस्थी लीलाधर बोरनारे यांच्या तक्रारीवरून योगेश रमेशचंद्र शर्मा (जळगाव), मंगल संजय जाधव (मुंबई-बदलापूर), संभाजी श्रीरंग सावंत (बदलापूर) अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघा तरुणांना मंगल जाधव मॅडमकडे नेणारा मध्यस्थी योगेश शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर संशयिताला आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर. न्या. बी. डी. गोरे यांच्या न्यायालयाने संशयिताला सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दोघांच्या फसवणुकीचा घटनाक्रम 
लीलाधर बोरनारे आणि तौसिफ शेख या दोघा तरुणांना लुबाडणाऱ्यांमध्ये यावल ट्रेझरीत कार्यरत कर्मचारी आणि "मविप्र'च्या यावल येथील नूतन मराठा महाविद्यालयात कार्यरत ग्रंथपालाचा समावेश असल्याचे तरुणांनी जबाबात नमूद केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक पदावर नोकरी लावून देण्यासाठी या दोघांच्या सूचनेवरून दोघे तरुण 28 जुलै 2017ला मुंबईला गेले, कल्याण रेल्वेस्थानकावर मध्यस्थी दलाल योगेश शर्मा याने आपल्याला मॅडमकडे जावे लागेल असे म्हणत फोन लावला, मॅडमचा चालक तिघांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर आला. तेथून बदलापूर येथे मॅडम मंगल जाधव यांच्या घरात देवाण घेवाणीसह सर्व बोलणी झाल्यावर नोकरीची हमी देण्यात येऊन वैद्यकीय तपासणीसाठी तयार राहण्याचे सांगण्यात आले. 

अवर सचिवांचे आदेशित पत्रे 
मंत्रालयातील मुख्य अवर सचिवांच्या स्वाक्षरीचे पत्र (बाय हॅण्ड) नाशिक जिल्हा रुग्णालयात देऊन दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तसेच पत्र पोलिस व्हेअरीफीकेशनसाठी देण्यात येऊन लीलाधरची जळगावात तर, तौसिफ या तरुणाची यावल पोलिस ठाण्यात व्हेअरीफिकेशन होऊन दोघांवर कुठलेच गुन्हे दाखल नसल्याचे शासकियपत्रही देण्यात आले. ते बायहॅण्ड घेऊन गेल्यावर मंगल जाधव मॅडमांनी 23 जुलै 2017ची बॅकडेटेड शासकीय नियुक्तीची पत्रे दिली. 

मंत्रालयात बाईंचा रुबाब 
गुन्ह्यातील संशयित महिला मंगल जाधव यांचे मुंबई मंत्रालयात अधिकाऱ्यांशी ओळखी आहे, विद्यमान मंत्री, आमदार आणि मोठा लवाजमा या मॅडमकडे असल्याची बाब समोर आली असून गुन्ह्याच्या तपासात जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांसह राज्यात ही या ठगबाजांनी बेरोजगार तरुणांना गंडवल्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com