बनावट कागदपत्रांद्वारे संस्थेची 45 लाखांत फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे संस्थेची 45 लाखांत फसवणूक

जळगाव : पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण संस्थेत "एजंट' म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने बनावट कागदपत्रे व खोट्या स्वाक्षऱ्या करून संस्थेला अनुदान म्हणून मिळालेली 45 लाखांची रक्कम परस्पर काढून संस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थाचालक महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
रायपूर (ता. जळगाव) येथील भारती गजेंद्रसिंग परदेशी यांचे पती गजेंद्रसिंग परदेशी यांची (कै.) घनश्‍याम जयराम राजपूत बहुद्देशीय संस्था ही नोंदणीकृत आहे. संस्थेच्या नावावर राज्य कौशल्य विकास सोसायटीअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाचे सेंटर सुरू करून देतो, असे सांगून भूषण बक्षे याने संस्थेची मूळ कागदपत्रे, बॅंक पासबुक झेरॉक्‍स, एक कोरा धनादेश, ई-मेल, वीजबिल, जागेचा नकाशा, शैक्षणिक कागदपत्रांसह इतर अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याअंतर्गत 31 ऑगस्ट 2016 ला प्रशिक्षण केंद्र सुरू केले. प्रशिक्षण देण्याच्या बदल्यात शासनाकडून संस्थेला मिळणारे मानधन मिळत नसल्याची तक्रार गजेंद्रसिंग पाटील यांनी "एजंट' भूषण बक्षे याच्याकडे केली. काहीतरी सांगून बक्षे याने वेळ मारून नेली. मात्र, तरीदेखील अनुदान मिळत नसल्याने पुढील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास अडचणी येत असल्याचे सांगून परदेशी यांनी भूषण यास सांगितले. 

तीन टप्प्यांत दिले सहा लाख 37 हजार रुपये 
अनुदान मिळेपर्यंत भूषण बक्षे याने गजेंद्रसिंग परदेशी यांना 16 मार्च 20018 ते 3 एप्रिल 2018 पर्यंत तीन टप्प्यांत सहा लाख 37 हजार रुपये उसनवारी म्हणून दिले. त्यानंतर परदेशी यांनी त्यांचे मित्र अमित राजूसिंग चव्हाण यांनी पंतप्रधान विकास कौशल्य योजनेंतर्गत "मयुरेश्वर ऍकॅडमी' या नावाने पिंप्राळ्यातील वीर सावरकरनगरात दुसरे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या केंद्रात "एजंट' म्हणून भूषण बक्षे हा काम पाहत होता. 

"माहितीच्या अधिकारा'त फुटले बिंग! 
दुसऱ्या प्रशिक्षण सेंटरची कागदपत्रे गजेंद्रसिंग परदेशी व अमित चव्हाण हे दोघे भूषणकडे गेले होते. यावेळी त्यांना रायपूर येथील मयुरेश्वर स्कूल ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन हे सेंटर पिंप्राळा येथील पत्त्यावर असल्याचे समजले. यावेळी गजेंद्रसिंग व भारती परदेशी यांनी सेंटर स्थलांतरित का केल्याची विचारणा केली? यावेळी भूषण याने हे सेंटर पिंप्राळा येथून गणेश कॉलनीत हलवीत असल्याचे सांगितले; परंतु परदेशी दाम्पत्याने यास विरोध केला. त्यावर बक्षे याने हे सेंटर माझ्या मालकीचे असून, याच्याशी तुमचा काहीही संबंध नसल्याचे परदेशी यांना सांगितले. त्यानंतर परदेशी यांनी या प्रशिक्षण केंद्राची माहिती "माहिती अधिकारा'अंतर्गत मागविली असता, त्यानंतर या सर्व प्रकरणाचे बिंग फुटले. 

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक 
प्रशिक्षण केंद्राला शासनाकडून मिळणारे अनुदान हडपण्यासाठी संस्थेच्या सभासदांसोबत भूषण गणेश बक्षे व शीतल भगवान पाटील या दोघांनी बनावट कागदपत्रे व खोट्या स्वाक्षऱ्या करून तसेच निमजाई फाउंडेशन या संस्थेचे सदस्य भारत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनी अनुदानाची रक्कम हडप करण्यासाठी खोटा ठराव करून घेतला. तसेच अनुदानाची येणारी 45 लाखांची रक्कम परस्पर निमजाई फाउंडेशनच्या खात्यावर जमा करून परदेशी यांची फसवणूक केली. या प्रकरणी भारती गजेंद्रसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com