बनावट दस्तऐवजांच्या आधारे साडेचार कोटीची जागा गडप

बनावट दस्तऐवजांच्या आधारे साडेचार कोटीची जागा गडप

जळगाव : शहरातील नवीपेठ या मुख्य बाजारपेठेतील साडेचार कोटी रुपये किमतीची जागा बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून बळकावल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ वारसदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून तत्कालीन भूमापन अधिकाऱ्यांसह मुकेश टेकवाणी यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

चंद्रकांत अशोक पाटील (वय 42, धंदा व्यापार, रा.गणेश कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, शहरातील सरस्वती डेअरी, सदानंद टि हाऊसच्या वरच्या मजल्यावरील जागा (सिटी.सर्वे क्रर्18/32फ) क्षेत्र 130.2 स्क्वेअर मीटर ही घर मिळकत जागा तक्रारदार यांचे आजोबा फकिरा माधव पाटील यांनी खरेदी केली होती. ही जागा नॅशनल इन्शुरन्स आणि ऍड. विक्रम पवार यांना भाडे तत्त्वावर दिल्या होत्या. मूळ मालक फकिरा पाटील यांच्या पश्‍चात त्यांची चार मुले व कुटुंबीयांचे या जागेकडे दुर्लक्ष झाले होते. वर्ष-2008 मध्ये चंद्रकांत पाटील यांनी मूळ दस्तऐवजासह भूमापन अधिकारी कार्यालयात वारस लावण्यासाठी संपर्क करून अर्ज सादर केला. त्या अनुसार 14 सप्टेंबर 2008 ला वारस कायद्यानुसार (जा.क्र.183/08) वारसनोंद मंजूर झाली होती. त्यानंतर एक महिन्यानंतर 1 ऑक्‍टोबरला मुकेश तुलसीदास टेकवाणी (रा.जळगाव) यांनी ही मिळकत त्यांची असल्याचे सांगत मंजूर नोंदीवर हरकत वजा तक्रार दाखल केली. परिणामी हरकतीचा शेरा मारून चंद्रकांत पाटील यांची नोंद स्थगित करण्यात आली. अपिलीय अधिकारी म्हणून पुन्हा अर्ज सादर केल्यावर 14 नोव्हेंबर 2008ला अपिलीय अधिकारी बाहेरगावी असल्याने सुनावणी झाली नाही. पुढच्या तारखेला (18 नोव्हेंबर) मूळ दस्तऐवज मिळवण्यासाठी बाहेरगावी असल्याने मूळ मालक चंद्रकांत पाटील हजर राहू शकले नाही. परिणामी मुकेश टेकवाणी याने हजर राहून त्याच्याकडील बनावट नोंदीचे दस्तऐवज सादर करून युक्तिवाद केला व तक्रारदार गैरहजर असल्याने अपिलीय अधिकारी भूषण नारायण मोहिते यांनी एकतर्फी निकाल दिला होता. तक्रारदाराला कळविणे बंधनकारक असताना देखील भूमापन परिरक्षक नितीन अटाळे यांनी कळवले नाही. वारंवार चौकशी करून उडवा उडवीची उत्तरे देत पिटाळून लावण्यात आले होते. 

माहिती अधिकाराने बिंग फुटले 
घडल्या सर्व प्रकाराबाबत आणि फेरफार नोंदीचे दस्तऐवज मिळावे याकरिता तक्रारदार चंद्रकांत पाटील यांनी कागदपत्रांची मागणी करून मिळालेले शासकीय दस्तऐवजाच्या छायाकिंत प्रती, मूळ मालक फकिरा पाटील यांच्या सहीचे दस्तऐवज असे सर्व हाती आल्यावर हस्ताक्षर तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतल्यावर फकिरा पाटील यांची स्वाक्षरी बनावट व खोटी असल्याचे आढळून आले होते. खोट्या स्वाक्षरीचे बनावट दस्तऐवज ग्राह्य धरून गुन्हा घडण्यास मदत करणाऱ्या भूमापन अधिकारी कार्यालयातील मोहिते व नितीन अटाळे यांच्यासह जागा बळकावणाऱ्या मुकेश टेकवाणी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार दिली होती. तक्रारीची अंतिम चौकशी होऊन आज रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात मुकेश टेकवाणीसहीत दोन्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध 4 कोटी 50 लाख रुपयांची मिळकत फसवणूक करून बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com