उमवि'मध्ये पुन्हा बोगस पीएच.डी प्रकरण! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

जळगाव : पीएच.डी. संशोधनासाठी वाङ्‌मयचौर्याच्या प्रकरणांची पार्श्‍वभूमी असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच. डी. मिळालेल्या आणखी तिघा जणांचे शोधप्रबंध "कॉपी- पेस्ट' अर्थात जसेच्या तसे असल्याचा धक्कादायक प्रकार "सकाळ'च्या हाती लागला आहे. या तिन्ही उमेदवारांनी 2014 व 2015 मध्ये भौतिकशास्त्र विद्याशाखेतून हे "संशोधन'(?) पूर्ण केले असून, त्यांचे मार्गदर्शकही एकच आहेत. तिघांच्या प्रबंधांमध्ये विषयाच्या शीर्षकापासून ते अनुक्रम, संशोधनाची पद्धत, विश्‍लेषण तसेच तथ्ये आणि शेवटच्या व महत्त्वपूर्ण अशा निष्कर्षांमध्येही फारसा बदल नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जळगाव : पीएच.डी. संशोधनासाठी वाङ्‌मयचौर्याच्या प्रकरणांची पार्श्‍वभूमी असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच. डी. मिळालेल्या आणखी तिघा जणांचे शोधप्रबंध "कॉपी- पेस्ट' अर्थात जसेच्या तसे असल्याचा धक्कादायक प्रकार "सकाळ'च्या हाती लागला आहे. या तिन्ही उमेदवारांनी 2014 व 2015 मध्ये भौतिकशास्त्र विद्याशाखेतून हे "संशोधन'(?) पूर्ण केले असून, त्यांचे मार्गदर्शकही एकच आहेत. तिघांच्या प्रबंधांमध्ये विषयाच्या शीर्षकापासून ते अनुक्रम, संशोधनाची पद्धत, विश्‍लेषण तसेच तथ्ये आणि शेवटच्या व महत्त्वपूर्ण अशा निष्कर्षांमध्येही फारसा बदल नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकारे अन्य विद्याशाखांतही आणखी काही प्रबंध "कॉपी- पेस्ट' झाले असण्याची शक्‍यता आहे. 

शिक्षण क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पावधीत लौकिक मिळविणाऱ्या विद्यापीठांमध्ये जळगावस्थित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचेही नाव घेतले जाते. साने गुरुजी, बहिणाबाईंसारख्यांच्या योगदानाचा अभिमान बाळगावा, अशी पार्श्‍वभूमी या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राला लाभली आहे. विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याची घोषणाही ताजीच आहे. मात्र, इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणेच काही अपप्रवृत्तींचा शिरकाव "उमवि'तही झाला असून, बोगस व वाङ्‌मयचौर्य केलेल्या पीएच.डी. प्रबंधांची प्रकरणे पुन्हा समोर आली आहेत. हे सर्व प्रबंध तीन ते चार वर्षांपूर्वीचे असल्याने विद्यमान कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन त्याची कशी दखल घेतात, हेही महत्त्वाचे आहे. एकूणच या प्रकारामुळे विद्यापीठाच्या गुणवत्तेबरोबरच शैक्षणिक नीतिमत्ता आणि प्रशासकीय पारदर्शकता पणाला लागली आहे. 
 
असे आहेत विषय
प्रशांत प्रभाकर जगताप ः Magnetic Perovskite Oxides : Studies related to Giant Magnetoresistance (GMR) and Tunneeling Magetoresistance (TMR) in samples of La1-Sr-MnO3 (जानेवारी 2014). 

इब्राहिम मोहम्मद अबुअसाज ः Functional Nano ceramics : Influence of co-dopants on the properties of Giant Magneto resistance (GMR) in samples of La1.A- MnO3 (A=Ca or Sr) (मार्च 2015). 

प्रमोद बळवंतराव पाटील ः Functional Nano Magnetic Oxide Ceramis : Studies of Giant Magnetoresistance (GMR) in samples of La1- A- MnO3 (A= Sr or Ca) synthesized by solution combustion method (डिसेंबर 2015). 
 

मार्गदर्शकही एकच! 
तिघाही उमेदवारांनी भौतिकशास्त्र या विद्याशाखेतून हे संशोधन केले असून, तिघांचे मार्गदर्शक म्हणून विद्यापीठातील भौतिकशास्त्र विद्याशाखेतील प्रा. डॉ. एस.टी. बेंद्रे यांनी काम पाहिले आहे. 
.... 
केवळ शब्द, परिच्छेद बदल 
या तिघांच्या संशोधनातील मजकुराचे अवलोकन केले असता, सुरवातीपासून अगदी शेवटी निष्कर्षांपर्यंतचा मजकूर जवळपास सारखाच असल्याचे दिसते. काही ठिकाणी परिच्छेदांमध्ये जुजबी बदल केला आहे. एका उमेदवाराने शब्दांची पूर्णरूपे (full form) वापरले असतील, तर दुसऱ्याने लघुरूपे (short form) वापरली आहेत. परिच्छेदही बऱ्याचअंशी एकसारखेच असून, केवळ बदल दिसावा म्हणून खाली-वर रचना करण्यात आल्याचे दिसून येते. 

प्रबंध ऑनलाइन उपलब्ध नाहीत 
"उमवि'तीलच नव्हे, तर इतर विद्यापीठांमधील संशोधनांचे प्रबंध "पीडीएफ' स्वरूपात संकेतस्थळांवर म्हणजेच ऑनलाइन उपलब्ध आहेत. मात्र, हे तिन्ही प्रबंध शोधूनही विद्यापीठाच्या वेबसाइटवर सापडत नाहीत. "उमवि'मध्ये चौकशी केली असता 2014 पर्यंतचेच प्रबंध अपलोड करण्यात आले असून, त्यानंतरचे अद्याप अपलोड झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: marathi news jalgaon froad phd univercity