न परवडणारे अवाजवी गाळेभाडे भरणार कसे? 

न परवडणारे अवाजवी गाळेभाडे भरणार कसे? 

जळगाव ः महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांतील दोन हजार 379 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपली आहे. महापालिका प्रशासनाने गाळेभाड्याची अवाजवी बिले दिल्याचा आरोप फुले मार्केटमधील गाळेधारकांचा आहे, तर फुले, सेंट्रल फुले मार्केटमधील अनेक गाळेधारकांनी दिलेल्या गाळेभाडे बिलापैकी ठराविक रक्कम दहा महिन्यांपूर्वी भरली आहे; परंतु अद्याप गाळ्यांचा तिढा सुटलेला नाही. महापालिकेने आकारणी केलेले भाडे, रेडीरेकनरनुसार सरसकट सर्व गाळ्यांचे केलेले मूल्यांकन चुकीचे आहे. त्यामुळे एवढे पैसे भरणे अशक्‍य असल्याचे गाळेधारकांकडून सांगितले जात आहे. यात महापालिका प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली तर यातून मार्ग काढता येईल, अशी गाळेधारकांची भूमिका आहे. 

फुले मार्केटमध्ये 259 गाळे 
फुले मार्केटमध्ये 259 गाळे असून, यात मुख्यत्वे करून रेडिमेड कपडे, साड्या, कटलरी आदी मोठ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. तीन मजल्यांचे असलेल्या या संकुलात एकाच व्यापाऱ्याची दोन ते तीन मिळून दुकाने आहेत. येथे स्वच्छतेचा प्रश्‍नदेखील गंभीर असून, गाळेधारकच हॉकर्सना जागा बसण्यासाठी भाड्याने देतात. त्यामुळे अतिक्रमणही फोफावले आहे. 

अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास 
फुले मार्केटमधील दुकानाबाहेरील वाढलेल्या अतिक्रमणाला दुकानदारदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या महिला, पुरुषांना पादचारी मार्गावरून जाताना त्रास सहन करावा लागतो. पादचारी मार्गावर अनेक हॉकर्सनी दुकाने थाटल्याने ही समस्या निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाकडूनदेखील याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. 

सरसकट मूल्यांकनाने 30 पट भाडेवाढ 
महापालिका प्रशासनाने अवाजवी दिलेले भाडे गाळेधारकांना भरणे अशक्‍य आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार रेडीरेकनरनुसार गाळेभाडे आकारण्याच्या अटी-शर्ती दिल्या होत्या. त्यात रस्त्यालगत, मधले व वरच्या मजल्यावरील आकारणीचे दर दिलेले असताना महापालिका प्रशासनाने सर्वच गाळ्यांचे सरसकट रेडिरेकनरनुसार मूल्यांकन केले. त्यामुळे 30 पट अधिक गाळेभाडे हे कसे काय भरता येईल? 

रेडीरेकनरच्या अटी-शर्तींत शासनाने स्पष्ट उल्लेख केला आहे; परंतु महापालिका प्रशासन सरसकट सर्वच दुकानांना रेडीरेकनरचे दर लावत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तत्कालीन सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने हा प्रश्‍न त्याचवेळी सोडविणे अपेक्षित होते. फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी नियमानुसार भाडे भरले आहे. 

- हिरानंद मंधवानी, अध्यक्ष, फुले मार्केट असोसिएशन 
 
तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी 40 क्रमांकाचा महासभेत केलेला ठराव मुळात चुकीचा असल्याने हा गाळ्यांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने निवडणुकीत आश्‍वासन दिले असून, त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. पाचपट दंडाचा ठराव महासभेत रद्द करावा, तसेच गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा. 
- राजेश वरयानी, गाळेधारक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com