गांधी जयंतीला काढणार कर्मचारी पायी पेंशन दिंडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जळगाव : तीन दिवस संप करूनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन आक्रमक झाली असून 2 ऑक्‍टोबर गांधी जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी ते मंत्रालय लॉंगमोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटनेने आज उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांना याविषयी निवेदन दिले. 

शासनाने 1 ऑक्‍टोबर 2005 च्या अधिसूचनेने सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना म.रा.ना.से अधी.1982 व 84 ची निवृत्तिवेतन योजना बंद करून पारिभाषित अंशदायी पेंशन योजना सुरू केली आहे. या योजनेचे स्वरूप व अंमलबजावणी पाहता या योजनेतून जुन्या पेंशन प्रमाणे सुनिश्‍चित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य असुरक्षित झाले आहे. त्यामुळे या नव्या पेंशन योजनेविषयी राज्यात लाखो कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 
अंशदायी पेंशन योजना बंद करून 1982 व 84 ची जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी संघटनेने अनेकदा हजारो कर्मचाऱ्यांसह धरणे, उपोषण, मोर्चे व आंदोलन केले आहेत. 16 मार्च 2016 च्या मुंबई मंत्रालयातील संघटनेच्या धरणे आंदोलनात राज्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर स्वतः येऊन तसेच नागपूर येथील आंदोलनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास स्वतः पाचारण करून सेवानिवृत्ती नंतर उपदानाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अजूनही त्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. 
निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा मारुती ठाकरे-पाटील, राज्य प्रतिनिधी मुजीब रहमान, जिल्हा सल्लागार नाना पाटील, जिल्हा संघटक विपिन पाटील, महेंद्र देवरे, जिल्हा कोशाध्यक्ष राकेश पाटील व प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: marathi news jalgaon gandhi jayanti pantion dindi