गणरायाच्या दर्शनाची वाट बनली बिकट! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जळगाव : शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र तरसोद या गणरायाच्या जागृत देवस्थानापर्यंत जाण्याची भाविकांची वाट अत्यंत बिकट बनली आहे. महामार्गावरील तरसोद फाट्यापासून तरसोद गाव व पुढे मंदिरापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था व अक्षरश: चाळण झाली आहे. दरम्यान, फाट्यापासून गावापर्यंतचा दीडपदरी रस्ता मंजूर असून, त्याची निविदाप्रक्रिया होऊन कार्यादेशही देण्यात आले आहेत, तरी काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम असल्याची माहिती समोर आली आहे. 

जळगाव : शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र तरसोद या गणरायाच्या जागृत देवस्थानापर्यंत जाण्याची भाविकांची वाट अत्यंत बिकट बनली आहे. महामार्गावरील तरसोद फाट्यापासून तरसोद गाव व पुढे मंदिरापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था व अक्षरश: चाळण झाली आहे. दरम्यान, फाट्यापासून गावापर्यंतचा दीडपदरी रस्ता मंजूर असून, त्याची निविदाप्रक्रिया होऊन कार्यादेशही देण्यात आले आहेत, तरी काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम असल्याची माहिती समोर आली आहे. 
जिल्ह्यात गणपतीची जागृत देवस्थाने म्हणून एरंडोल तालुक्‍यातील श्रीक्षेत्र पद्मालय व जळगावपासून सहा- सात किलोमीटरवरील श्रीक्षेत्र तरसोद प्रसिद्ध आहेत. या दोन्ही ठिकाणी जिल्ह्यातूनच नव्हे; तर अन्य भागातूनही भाविक येत असतात. चतुर्थीला या मंदिरांत भाविकांच्या मोठ्या रांगाही लागतात. 

तरसोदची वाट कठीण 
श्रीक्षेत्र तरसोद जळगावपासून अवघ्या सात किलोमीटरवर असून, महामार्गावर भुसावळकडे जाताना तरसोद फाट्यापासून तरसोद गाव तीन किलोमीटर व पुढे गावापासून मंदिरापर्यंतचे अंतर सव्वा किलोमीटर आहे. मात्र, फाटा ते गाव या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला प्रत्येक दोन- चार फुटांवर मोठमोठे खड्डे पडले असून, चारचाकी वाहन चालविणे केवळ अशक्‍य अशी स्थिती आहे. पुढे गावापासून मंदिरापर्यंतचा रस्ताही चांगला नाही. तरसोदला येण्यासाठी पर्यायी मार्ग नशिराबादहून आहे. नशिराबाद ते मंदिरापर्यंतचे अंतर अडीच किलोमीटर आहे. मात्र, हा रस्तादेखील अत्यंत खराब अवस्थेत आहे. 

निकृष्ट दर्जाचे काम 
दोन वर्षांपूर्वी तरसोद फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक-दोन पावसातच रस्ता पूर्णपणे उखडला गेला. दर दोन-चार वर्षांआड या रस्त्याची दुरवस्था होते. त्याचे कामही दिले जाते. मात्र, रस्ता टिकत नाही. त्यामुळे या दोन्ही बाजूंकडील रस्त्यांकडून येताना भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. थोडाफार अधिक खर्च करून रस्त्याचे काम काही वर्षे टिकले पाहिजे असे करावे, अशी मागणी केली जात आहे. 

दीडपदरी रस्ता होणार! 
काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. फाट्यापासून गावापर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता दीडपदरी होणार असून, त्यासाठी निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित मक्तेदारास कार्यादेश देण्यात आले असून, अद्याप काम सुरू झालेले नाही. पावसाळा झाल्यानंतर या कामास सुरवात होईल, असे सांगितले जात आहे. 

मंदिरापर्यंतचा रस्ताही मंजूर 
गावापासून मंदिरापर्यंत सव्वा किलोमीटरच्या रस्त्याचे कामही मंजूर आहे. हा रस्ता कॉंक्रिटचा होणार असून, त्याच्यामध्ये दुभाजक व दुभाजकात पथदिवे, असे या कामाचे स्वरूप आहे. पुढे मंदिरापासून नशिराबादपर्यंतचा अडीच किलोमीटरचा रस्ताही मंजूर असून, ही दोन्ही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. 

Web Title: marathi news jalgaon ganesh mandir tarsod road