esakal | गणेशोत्सवानिमित्त बाजारात कोट्यवधींची उलाढाल 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंसह अन्य वस्तू खरेदी केल्या. तसेच बाप्पाच्या आगमनानिमित्त विविध डेकोरेशन साहित्याची दुकाने, मिठाईच्या दुकानांवर देखील आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. त्यामुळे बाजारपेठेत आज सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली. 

गणेशोत्सवानिमित्त बाजारात कोट्यवधींची उलाढाल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव - गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंसह अन्य वस्तू खरेदी केल्या. तसेच बाप्पाच्या आगमनानिमित्त विविध डेकोरेशन साहित्याची दुकाने, मिठाईच्या दुकानांवर देखील आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. त्यामुळे बाजारपेठेत आज सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली. 

सर्वांच्या लाडक्‍या बाप्पाच्या आगमनाने शहरात आज चैतन्याचे वातावरण होते. त्यात बाजारपेठेत देखील उत्साह पाहायला मिळाला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन वाहने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खरेदी करून घरी घेऊन जाणाऱ्यांची देखील आज मोठी गर्दी दिसत होती. बाजारपेठेत मंदीचे सावट असताना आज गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांच्या खरेदीमुळे नवचैतन्य आल्याचे दिसून येत होते. त्यात गणपतीच्या मूर्ती, पूजा साहित्य, डेकोरेशनचे साहित्य आदी दुकानांवर ग्राहकांची रेलचेल होती. 

वाहन खरेदीचा साधला मुहूर्त 
सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रचंड मंदीचे सावट असल्याने वाहन उद्योगात याचा मोठा परिणाम दिसत आहे; परंतु गणेशोत्सवाच्या मुहूर्ताने या उद्योगाच्या हंगामाची सुरवात आज समाधानकारक झाली. वाहन व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विविध ऑफर्समुळे अनेकांनी नवीन दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केल्याने वाहन विक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मोबाईल खरेदीसाठी गर्दी 
गणपतीच्या आगमनाच्या मुहूर्तावर शहरातील विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू विक्रेत्यांनी विविध ऑफर्स ग्राहकांसाठी दिल्या होत्या. त्यामुळे नवीन एलसीडी, वॉशिंग मशिन, फ्रिज आदी वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या दालनात दिसत होती. तसेच नवीन मोबाईल खरेदीसाठी देखील अनेकांनी आजचा मुहूर्त साधून खरेदी केली. 

डेकोरेशन, मिठाईच्या दुकानांवर गर्दी 
शहरात उत्साहपूर्ण वातावरणात "श्रीं'ची स्थापना करण्यासाठी गणेशमूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल शहरातील अनेक भागात लागलेले होते. यात शिवाजीनगर पूल रस्ता, आकाशवाणी चौक ते प्रभात कॉलनी, गिरणा टाकी, महाबळ, पिंप्राळा चौक, कालिंकामाता चौफुली, अंजिठा चौफुली आदी ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी 
गर्दी होती. तसेच डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य, पूजा साहित्य खरेदी करणाऱ्यांची गर्दी दिसून येत होती. 

"फायनान्स'कडे ओढा 
ग्राहकांना दुचाकी, चारचाकी वाहने खरेदीसाठी तसेच इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मोबाईल आदी वस्तू खरेदी करण्यासाठी \फायनान्सची सुविधा आहे. त्यामुळे रोख खरेदीसाठी पैसे कमी असून, देखील उरलेले पैसे हप्ताने फेडून वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे फायनान्सचे अधिक व्यवहार होत आहेत. 


गणेशोत्सव हे वाहन उद्योगाच्या हंगामाची सुरवात असते. त्यामुळे बाप्पाच्या कृपेने दुचाकी व चारचाकी वाहन विक्रीच्या व्यवसाय समाधानकारक होता. त्यामुळे दसरा, दिवाळी सणामध्ये देखील वाहन विक्री व्यवसाय चांगला राहील. 
- किरण बच्छाव, संचालक, सातपुडा ऑटोमोबाईल. 
 

loading image
go to top