चोऱ्या, घरफोड्यांचा आलेख वाढता-वाढता वाढे 

चोऱ्या, घरफोड्यांचा आलेख वाढता-वाढता वाढे 

जळगाव : शहरात गेल्या तीन महिन्यांचा गुन्हे आढावा घेतला तर, चोऱ्या-घरफोड्यांच्या गुन्ह्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. चोरट्यांनी जळगाव शहराला लक्ष्य केल्याच्या आविर्भावात शहरात रोज घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. एकाच रात्रीतून चार ते पाच घरे फोडण्यात येत असून आठवडाभरापासून चोरट्यांचा आलेख वाढताच आहे. शहरात गेल्या तीन महिन्यात 55 घरफोड्या रेकॉर्डवर तर, दाखल नसलेल्या वेगळ्या अशा 60 ते 65 घरफोड्यांचे गुन्हे घडले आहेत. इकडे धंदे बंद म्हणून "डिटेक्‍टिव्ह' पोलिसिंग इतिहास जमा होण्याच्या मार्गावर पोचली आहे. 

जिल्हा पोलिसदल वर्ष-2011 ते 2015 नाशिक परिक्षेत्रात अव्वल क्रमांकावर होते. आता मात्र, पोलिसदलाची पुरती रयाच गेल्याची अवस्था निर्माण झाली असून त्याचा विपरीत परिणाम सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. रस्त्यावर अपघाती मृत्यू, आर्थिक गुन्हेगारी, चोऱ्या आणि घरफोड्यांचे वाढते गुन्हे, चाकूहल्ले, खुनाच्या गुन्ह्यांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे की, नाही अशीच अवस्था निर्माण झाली आहे. 

पोलिसांची अपंग फौज 
शहरात नागरिकांची मालमत्ता सुरक्षित नाही. वाढत्या घरफोड्यांना काही अंशी त्या-त्या परिसराची भौगोलिक रचना, नागरिकांचा निष्काळजीपणा जबाबदार असला तरी, पोलिस दलात काम करण्याची "दानत' शिल्लक नसल्याची अवस्था हे एक प्रमुख कारण आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदली गॅझेटमध्ये बहुतांश पोलिस कर्मचाऱ्यांची बदली कुठल्यातरी बंगल्यावरील यादीनुसार झालेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या जागी मंत्र्यांच्या ताफ्यात नवखे कर्मचारी धुरा सांभाळत आहेत. गुन्ह्यांची पद्धत, गुन्हेगारी टोळ्या, घरफोडी, दरोड्यातील गुन्हेगारांची मोडस ऑप्रेंडीचा अभ्यास नाही अशाच कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक झाला आहे. अशा अधू-अपंग फौज असल्यावर कायदा व सुव्यवस्थेची कल्पनाच केलेली बरी. 

धंदे बंद.. काम बंद 
नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून डॉ. छेरींग दोरजे यांनी कार्यभार सांभाळल्यापासून जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे, सट्टा, पत्ता, जुगार, दारुचे गुत्त्यावर जोरदार कारवाई करण्यात आली. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास थेट पोलिस निरीक्षकांवरच कारवाईचे संकेत दिल्याने सुरू असलेले धंदे पूर्णत: बंद झाले नसले तरी बऱ्यापैकी नियंत्रणात आहेत. यातील वरकमाई बंद झाल्याने गुन्हेशोध पथकातील पोलिसांनी काम करणेच बंद केले आहे. त्यात पोलिस अधीक्षकांनी 72 पोलिसांना कोर्सला पाठवल्याने त्याच कर्मचाऱ्यांनी छुप्या पद्धतीने असहकार पुकारल्याची चर्चाही पोलिसदलात आहे. 

पोलिस गस्त ढेपाळली 
प्रामाणिकपणे पोलिसांनी गस्त घालावी यासाठी उपविभागात आरएफआयडी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र, गस्तीवर लक्ष केंद्रित न करता केवळ तांत्रिक रित्या "पंच' करून हजेरी देऊन कर्मचारी पळ काढत होते. बघता-बघता वर्षभरात ही यंत्रणा गुंडाळावी लागली. आरएफबआयडी यंत्रे धूळ खात पडले आहे. आता जुन्या पद्धतीच्या डायऱ्या लावण्यात आल्या असून सोईनुसार त्या भरल्या जातात. 
 
रेकॉर्डवरील गुन्हे कमीच! 
घरफोडी, चोरीचा गुन्हा घडल्यावर पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. दुचाकी चोरी, मोबाईल चोरीत आठवडाभर, पाकीट चोरीत तीन दिवस वाट पाहण्याचा सल्ला तक्रारदाराला दिला जातो. घरफोडीचे गुन्हेही आता पोलिस तक्रार अर्जावर गुंडाळू लागले आहेत. कमी रकमेची घरफोडी असल्यास तक्रार न देण्याचा सल्लाही पोलिस देऊ लागले आहे. परिणामी तक्रारदार वारंवार पोलिस ठाण्याचे तोंड नको म्हणून तक्रार न देताच शांत बसतो. परिणामी घटना आणि दाखल गुन्ह्यांत मोठी तफावत दिसते. 

"सीएम' साहेब इकडेही द्या लक्ष 
चोरी, घरफोडीचे गुन्हे नित्याचेच झाले आहे. खून, प्राणघातक हल्लेही थांबायला तयार नाही. वाळू व्यवसायातील स्पर्धा एकमेकांच्या जिवावर उठलीय. अवैध वाळू वाहतुकीची समस्या भीषण आहे. हे सारे प्रकार पोलिस यंत्रणेच्या डोळ्यांदेखत सर्रास होत आहेत. परंतु, यंत्रणा हतबल असल्याचे दिसते. मुख्यमंत्री स्वतः पारदर्शी, कार्यक्षम असल्याचे त्यांच्या एकूणच वर्तणुकीवरुन दिसते. पण त्यांच्याच गृह विभागाची लक्तरे कायदा-सुव्यवस्थेने कशी वेशीवर टांगली, याचे जळगाव जिल्हा उत्तम उदाहरण आहे. महाजनादेशयात्रेत या सुव्यवस्थेच्या यात्रेकडेही त्यांनी बघावे, अशी जळगावकरांची अपेक्षा आहे. 

दाखल घरफोड्या 
जानेवारी : 9 (प्रत्यक्षात 11) 
फेब्रुवारी : 10 (प्रत्यक्षात 10) 
मार्च : 4 (प्रत्यक्षात 7) 
एप्रिल : 5 (प्रत्यक्षात 8) 
मे : 7 (प्रत्यक्षात 9) 
जून : 9 (प्रत्यक्षात 15) 
जुलै : 12 (प्रत्यक्षात 18) 
ऑगस्ट : 22 (दाखल असलेले- नसलेले) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com