घरकुल खटल्यात ऍड. सावंतांची नियुक्ती 

घरकुल खटल्यात ऍड. सावंतांची नियुक्ती 

जळगाव : पालिकेच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांसह 48 आरोपींना कोटींचा दंड व मोठ्या शिक्षेचा निर्णय लागल्यानंतर काही आरोपींच्या वतीने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या निकालानंतर या खटल्यात आता उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. अमोल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून, ऍड. प्रवीण चव्हाण त्यांचे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. 

तत्कालीन पालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेत सुमारे 30 कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह गुलाबराव देवकर, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे अशा 48 आरोपींना 31 ऑगस्टला धुळे येथील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. जैन यांना सात वर्षांच्या शिक्षेसह 100 कोटींचा दंड, राजा मयूर व नाना वाणी यांनाही तेवढीच शिक्षा व प्रत्येकी 40 कोटींचा दंड व अन्य आरोपींनाही शिक्षेसह लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याने राज्यभर हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. 

ऍड. सावंत मांडणार बाजू 
या शिक्षेला काही आरोपींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. गेल्या तीन सप्टेंबरला हे प्रकरण न्यायालयासमोर येऊन न्या. बोरा यांनी नकार दिल्यानंतर ते न्या. जाधव यांच्या पीठासमोर वर्ग झाले. या संपूर्ण खटल्यात सरकारी वकील म्हणून आतापर्यंत ऍड. प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडलेली असताना शासनाने आता या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत ऍड. अमोल सावंत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे ऍड. चव्हाण यांना त्यांचे सहाय्यक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ऍड. सावंत हे मूळ धुळे येथील असून, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे व्हाइस चेअरमनही आहेत. 
 
या संपूर्ण खटल्याचा सखोल अभ्यास करून ऍड. प्रवीण चव्हाण यांनी प्रामाणिकपणे सरकारची बाजू मांडली. त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्यात आरोपींना शिक्षा झाली असून, त्यांचीच हायकोर्टासाठीही नियुक्ती व्हायला हवी होती. 
- ऍड. विजय भास्कर पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com