घरकुल घोटाळा : महिन्यापासून सहा आरोपी परस्पर जिल्हा रुग्णालयात 

घरकुल घोटाळा : महिन्यापासून सहा आरोपी परस्पर जिल्हा रुग्णालयात 

धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाने 31 ऑगस्टला 49 आरोपींना विविध स्वरूपाची शिक्षा सुनावली. यानंतर महिनाभरापासून शिक्षेतील सहा आरोपी (कैदी) परस्पर येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले. याबाबत वारंवार विचारणा केल्यावरही रुग्णालय व्यवस्थापन प्रतिसादच देत नसल्याने धुळे जिल्हा कारागृहापुढे गंभीर पेच निर्माण झाला आहे. 
जळगाव घरकुल प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. सृष्टी निळकंठ यांनी 31 ऑगस्टला 49 आरोपींना शिक्षा सुनावली. यात एका महिला आरोपीचा आजाराने पाय कापला गेल्याने तिला जामीन मंजूर झाला. पोलिस पथकाकडून उर्वरित 48 आरोपींची वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांना धुळे जिल्हा कारागृहात आणणे क्रमप्राप्त होते. पैकी प्रथम 38 आरोपी जिल्हा कारागृहात दाखल झाल्यावर त्यांची नाशिक कारागृहात रवानगी झाली. उर्वरित दहा आरोपी उपचारांच्या नावाखाली जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मुक्कामी राहिले. नंतर दहापैकी तीन आणि एक, असे चार आरोपी जिल्हा कारागृहात दाखल झाले. पुढे त्यांची रवानगी नाशिक कारागृहात झाली. उर्वरित सहा आरोपींना जिल्हा रुग्णालयाने उपचारांच्या नावाखाली परस्पर दाखल करून घेतले. त्यास महिना झाला आहे. 

रुग्णालय व्यवस्थापन "गप्प' 
शिक्षेतील संबंधित सहा कैदी आरोपींची येथील जिल्हा कारागृहात नोंद न झाल्याने चिंताक्रांत कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार सुरू केला. त्यास रुग्णालय व्यवस्थापन प्रतिसाद देण्यास तयार नाही. विशेष म्हणजे संबंधित आरोपींची नावे सांगण्यात जिल्हा रुग्णालय टाळाटाळ करते. या आरोपींना नेमका काय आजार जडला आहे, महिना होऊनही ते बरे का होत नाहीत, ते कारागृहात दाखल का होत नाहीत, त्यांना रुग्णालयात कुठल्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर कुठले वैद्यकीय उपचार सुरू आहेत, त्यांच्यावर कोणत्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, ते सहा आरोपी "प्रिझनर वॉर्ड'मध्ये आहेत किंवा कसे, तसे नसल्यास कारणे काय, अशी विचारणा कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाला वेळोवेळी पत्राद्वारे केली. त्यास रुग्णालय व्यवस्थापन प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. यावर स्मरणपत्रे देऊनही रुग्णालय व्यवस्थापनाकडून कारागृह प्रशासनाला अद्याप समर्पक उत्तर मिळालेलेच नाही, असे तुरुंगाधिकाऱ्यांनी आज सांगितले. त्यामुळे हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

सखोल चौकशीची मागणी 
यामागच्या कारणांची, वैद्यकीय अधिष्ठाता, रुग्णालय अधीक्षक, देखरेखीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची न्यायालयाने चौकशी करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जळगाव घरकुल घोटाळ्याच्या खटल्याचे कामकाज येथील जिल्हा विशेष न्यायालयात चालले. असे असताना न्यायालयीन शिक्षेबाबत आदेशाचे उल्लंघन करत सहा आरोपी (कैदी) परस्पर जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत का, असा प्रश्‍न विविध स्तरांवर उपस्थित होत आहे. तसेच जिल्हा रुग्णालय आणि अधिष्ठाता कुणाच्या दबावाखाली वावरत आहेत, याचीही जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चौकशी करावी, या प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती समाजासमोर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. यात कायदेशीर शिक्षेपासून सहा आरोपी कैद्यांना वाचविण्याचा प्रयत्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, वैद्यकीय अधिष्ठाता, देखरेखीतील वैद्यकीय अधिकारी तर करत नाही ना, अशी शंका जनमानसातून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी जळगावचे ऍड. विजय पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यासंदर्भात तयारी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

"ते' सहा आरोपी कोण? 
जिल्हा कारागृहात नोंदच न झालेल्या शिक्षेतील सहा आरोपींमध्ये विजय पंडितराव कोल्हे, साधना राधेश्‍याम कोगटा, अलका नितीन लढ्ढा, मीना अनिल वाणी, सुधा पांडुरंग काळे, लता रणजित भोईटे यांचा समावेश आहे. त्यांना "व्हीआयपी ट्रीटमेंट' आहे किंवा कसे, रुग्णालयाचे जेवण मिळते की बाहेरचे, त्यांना भेटावयास कोण येते, त्यांना इतर आरोपींप्रमाणे सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत किंवा कसे याबाबत सखोल चौकशीची मागणीही होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com